मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर, ऐतिहासिक कर्जमाफी वाऱ्यावर !

1 ऑक्टोबरला कर्जमाफी देणे अशक्य आहे अशी कबुलीच पणन आणि सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी दिली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2017 07:14 PM IST

मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर, ऐतिहासिक कर्जमाफी वाऱ्यावर !

26 सप्टेंबर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऐतिहासिक' असं म्हणत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. पण ही कर्जमाफी 1 आॅक्टोबरला देणे अशक्य असल्याची बाब समोर आलीये. विशेष म्हणजे कर्जमाफी घोषणेचा बोजवारा उडाला असताना मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेले आहे. त्यामुळे कर्जमाफी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय.

राज्यातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 जून 2017 रोजी 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. या निर्णयामुळे 90 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र, या ना त्या अटीमुळे राज्य सरकाराचा कर्जमाफीचा निर्णय वादात ठरला. आता तर 1 आॅक्टोबरची दिलेली डेडलाईनही सरकार पाळणार नाही हे आता स्पष्ट झालंय.

1 ऑक्टोबरला कर्जमाफी देणे अशक्य आहे अशी कबुलीच पणन आणि सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी दिली. बँकेकडून माहिती मिळणं बाकी आहे. अजूनही जिल्हा बँकांची माहिती आलेली नाही. तसंच राष्ट्रीयकृत बँकांची सर्वच माहिती येणं बाकी आहे अशी स्पष्ट माहिती देशमुख यांनी दिली.

10 लाख बोगस शेतकरी

एवढंच नाहीतर अलीकडे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 10 लाख बोगस कर्जदार शेतकरी असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे बोगस शेतकरी कोण ? असा संतप्त सवाल विरोधकांनी केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना घुमजाव करावं लागलं.

Loading...

आकडेवारीचा घोळ

राज्य सरकारने कर्जमाफीसाठी 58 लाख अर्ज आल्याची माहिती दिली होती. पण ५८ लाख नव्हे तर ५६ लाख ६५ हजार शेतकऱ्यांनीच कर्जमाफीसाठी अर्ज केले आहे. २ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आधार क्रमांक दिलाच नाही. त्यामुळे ५८ लाखांचा आकडा साॅफ्टवेअर चुकीमुळे आल्याचे सहकार विभागाचे स्पष्टीकरण दिलंय.

हा सरकारचा वेळकाढूपणा - तटकरे

दरम्यान,  मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर करताना ८९ लाख शेतकऱ्यांना आणि ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी असेल अशी घोषणा केली होती. म्हणजे सरकारकडे ही सगळी आकडेवारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बोगस म्हणणे चुकीचे आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी मुंबईत राहून गावी शेती करत असतात. मुंबई बँकेकडून हे शेतकरी कर्ज घेतात. सरकारचा ढोंगीपणा, ऑनलाईन अर्ज मागवणे, छानणी करणे यात वेळकाढूपणा सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.

एकूणच, मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत कर्जमाफीची घोषणा केली. पण गेल्या महिन्याभरापासून कर्जमाफी घोषणाचा बोजवारा उडालाय. 1 आॅक्टोबरची डेडलाईन जवळ असताना मुख्यमंत्री फडणवीस आजपासून दक्षिण कोरिया-सिंगापूर दौऱ्यावर गेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर कर्जमाफी वाऱ्यावर असं म्हणण्याची वेळ आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...