विधानसभेचा गड जिंकण्यासाठी भाजपच्या चाणक्यांचा मुख्यमंत्र्यांना मंत्र

'आम्ही सध्या विधानसभा निवडणुकीच्या मोड मध्ये आहोत. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे.'

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 09:35 PM IST

विधानसभेचा गड जिंकण्यासाठी भाजपच्या चाणक्यांचा मुख्यमंत्र्यांना मंत्र

प्रशांत लीला रामदास नवी दिल्ली 9 जून : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसलीय. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्राच्या कोअर टीम सोबत बैठक घेतली आणि त्यांना निवडणुकीचा मंत्र दिला. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब केलं. ज्या प्रमाणे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जागांचा विचार केला नाही त्याच पद्धतीने राज्यात मुख्यमंत्री आपला असावा त्यासाठी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या जागा कशा निवडणून येतील यासाठी काम करा असा आदेश शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक निवडणुकांबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीपूर्वी जाताना सांगितलं. आम्ही सध्या विधानसभा  निवडणुकीच्या मोड मध्ये आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तारही होणार आहे पण प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार आहे की नाही या संदर्भात केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बैठकीआधी अमित शहा यांनी  हरियाणा, झारखंड या राज्याच्या नेत्यांसोबतही बैठका घेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

शरद पवारांच्या वक्तव्याने नवा वाद

पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताने जे हवाई हल्ले केले ते पाकिस्तानमध्ये झालेच नव्हते असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. भारताने हे हल्ले पाकव्याप्त काश्मीरमध्येच केले होते आणि काश्मीरचा तो भाग हा भारताचाच भाग आहे असंही पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी Facebook Liveच्या माध्यमातून पवारांनी जो संवाद साधला त्यात त्यांनी हा गंभीर आरोप केला. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading...

पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी लोकांची दिशाभूल केली. पाकिस्तानात घरात घुसून मारू असं ते सारखं म्हणायचे. त्यामुळे लोकांना त्याचं आकर्षण वाटलं होतं. पण भारताचे हवाई हल्ले हे काही पाकिस्तानात झाले नाहीत तर ते काश्मीरात झाले होते आणि तो भारताचाच भाग आहे. सामान्य लोकांना आंतरराष्ट्रीय सीमा आणि अनेक गोष्टींची फारशी माहिती नसते त्याचा फायदा मोदींनी घेतला अशी टीकाही त्यांनी केली.

पाकिस्तान विरुद्ध व्देषाची भावना निर्माण करून मोदींनी देशातलं वातावरण दुषीत केलं. त्याला सांप्रदायीक रंग देण्यात आला असा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 08:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...