राज्याच्या राजकारणात अमोल कोल्हेंचं वजन वाढणार, राष्ट्रवादी देणार मोठी जबाबदारी

राज्याच्या राजकारणात अमोल कोल्हेंचं वजन वाढणार, राष्ट्रवादी देणार मोठी जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांनी विजय मिळवत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक कार्यक्रमांना अमोल कोल्हे हेदेखील उपस्थित असतात. त्यानंतर आता अजित पवार यांनी पुण्यातील भोसरी इथं बोलताना अमोल कोल्हे यांना राज्यात मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. 'अमोल कोल्हे हे निवडणुकीनंतर भोसरी इथं येत नाहीत, अशी तक्रार करू नका. ते दिल्लीत चांगलं काम करत आहेत. तसंच आगामी निवडणुकीतही त्यांना राज्यातील राष्ट्रवादीच्या इतर मोठ्या नेत्यांप्रमाणे जबाबदारी द्यायची आहे,' असं अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. याबाबत 'लोकसत्ताने' वृत्त दिलं आहे.

अजित पवारांचे कार्यक्रम आणि अमोल कोल्हे

बारामतीत आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आजारी असतानाही अजित पवारांच्या विनंतीला मान देवून खासदार अमोल कोल्हे यांनी बारामतीतील कार्यक्रमासाठी हजेरी लावली. 'तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असले तरी तुम्ही पाच मिनिटे का होईना बारामतीच्या कार्यक्रमाला या,' अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे आजारी असतानाही बारामतीच्या कार्यक्रमाला अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडला होता.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष्य वेधून घेतलं होतं. यावेळी त्यांनी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचं कौतुक झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्या नवाचाही समावेश होता.

VIDEO: विधानसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, इतर महत्त्वाच्या टॉप 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 09:00 AM IST

ताज्या बातम्या