महाडमधील सर्पमित्रांची केरळमध्ये कमाल; 20 साप सोडले सुरक्षित ठिकाणी!

महाडमधून केरळला रवाना झालेल्या आऊल्स व सीस्केप या संस्थेच्या सात जणांच्या टिमने नागरी वस्तीत शिरलेल्या सुमारे वीस सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम पूर्ण केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2018 04:32 PM IST

महाडमधील सर्पमित्रांची केरळमध्ये कमाल; 20 साप सोडले सुरक्षित ठिकाणी!

महाड (रायगड), 28 ऑगस्ट : देवभूमी केरळ मध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीनंतर पुरासोबत वाहून आलेले साप आणि इतर वन्यप्राणी घरात आणि गावात आश्रयाला आल्यामुळे मनुष्य आणि वन्यजीव या दोघांचाही जीव धोक्यात आला आहेत. या वन्यजीवांना त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी महाडमधून केरळला रवाना झालेल्या 'आऊल्स' व 'सीस्केप' या संस्थेच्या सात जणांच्या टिमने नागरी वस्तीत शिरलेल्या सुमारे वीस सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम पूर्ण केले आहे.

केरळ मध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि वनविभाग यांची कुमक कमी पडत असल्याने वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे जोस लुईस यांनी महाड येथील 'सिस्केप' आणि 'आऊल्स' या संस्थेच्या सदस्यांना या रेक्यू ऑपरेशनसाठी बोलावल्यानंतर 21 ऑगस्टला चिंतन वैष्णव, प्रणव कुलकर्णी, चिराग मेहता, योगेश गुरव (रा. महाड) नितीन कदम, ओंकार वरणकर (रा. बिरवाडी) आणि कुणाल साळुंखे (रोहा) हे सात जण केरळ येथे गेले आहेत.

केरळ वनविभागाच्या सहकार्याने एर्नाकुलम, कोडानाड आणि चानाकुडी या भागात 'स्नेक रेस्क्यू ऑपरेशन' सुरू करण्यात आले आहे. चिंतन वैष्णव आणि प्रणव कुलकर्णी हे दोघे एर्नाकुलम येथे, कुणाल सावंत, योगेश गुरव आणि नितीन कदम हे कोडानाड येथे तर चिराग मेहता आणि ओंकार वरणकर हे चानाकुडी येथे सूरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी झाले आहेत. केरळच्या वनविभागाने या तिनही टीमला एक वाहन आणि त्यांच्यासमवेत एक वन अधिकारी उपलब्ध करून दिला आहे.

केरळ सरकारने नागरी वस्तीमध्ये, घरांमध्ये शिरलेल्या सापांची माहिती देण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली असून, त्यावर कॉल आल्यानंतर या टीमचे सदस्य तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून त्या सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम करीत आहेत. आतापर्यंत या टीमने सुमारे वीस साप पकडले आणि त्यांची सुरक्षित सुटका केली. यामध्ये नाग, अजगर, त्याचप्रमाणे अन्य काही विषारी सापांचाही समावेश आहे.

  VIDEO : बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...