सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 17 मार्च : जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकरांनी माघार घेतली आहे. औरंगाबाद येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याने रावसाहेब दानवेंची उमेदवारी पक्की झाली आहे. त्यानंतर झालेल्या युतीच्या मेळाव्यात खोतकरांनी आपण एक सच्चे शिवसैनिक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्णयाविरोधात गेलेलो नसून, उद्धव ठाकरेंचा निर्णय आम्हाला सर्वश्रेष्ठ असल्याचं वक्तव्य केलं. आपण आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू असेही यावेळी ते म्हणाले. ''परीक्षा आधी माझी आहे आणि मी परीक्षेत पास होणारच; दानवेही पास व्हावेत ही अपेक्षा आहे, मधल्या काळात आमच्यात आणिबाणी लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीने आज ती उठली आहे,'' असं अर्जून खोतकर म्हणाले.