गिरीश महाजनांच्या उपस्थितीत राडा, भाजप जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

गिरीश महाजनांच्या उपस्थितीत राडा, भाजप जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

जळगावमध्ये भाजपमधील वैयक्तिक वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

जळगाव, 11 एप्रिल : अमळनेरमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात जलसंपदा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी माजी आमदाराला बेदम मारहाण केली. याप्रकरणी आता भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जळगावमध्ये भाजपमधील वैयक्तिक वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर बी. एस. पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर उदय वाघ यांच्यासह इतर 7 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

अमळनेरमध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात शाब्दीक चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. कार्यकर्त्यांनी पाटील यांना  अक्षरश: बुटाने मारहाण केली.

कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की, महाजनांनी अक्षरश: कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली ढकलून दिले. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांनी माजी आमदार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. एकीकडे हा गोंधळ सुरू होता तर दुसरीकडे 'स्मिता वाघ आगे बढो', अशा घोषणा देण्यात आल्या.

काय म्हणाले गिरीश महाजन?

या प्रकरणावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'घडलेला सर्व प्रकार हा घृणास्पद होता', अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. तसंच उदय वाघ यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पक्षाला आहे. पक्षश्रेष्ठी याबद्दल योग्य तो निर्णय घेतील, असंही महाजन म्हणाले.

राष्ट्रवादीची टीका

जळगावमधील भाजपमधील अंतर्गत वादावर राष्ट्रवादीने टीका केली आहे. राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित या वादावर भाष्य केलं आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

"जे पेराल ते उगवेल. गेली साडेचार वर्ष सत्तेत एकत्र राहून देखील भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. भारतीय जनता पक्षाच काम पाहून शिवसेनेचे नेते कधी राजीनामा देतात याची वाट शिवसैनिक पहात होते मात्र सत्तेच्या स्वार्थासाठी सेना भाजपा एकत्र आले.

पण लोकांच काय? पक्षासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांच काय? हे प्रश्न ज्या पक्षाला पडत नाहीत त्याच पक्षासोबत असा प्रकार घडण्याची वेळ येते. अन्यायाची भाषा कार्यकर्त्यांना चांगलीच समजते म्हणूनच हा प्रकार भाजपच्या नेत्यांना सहन करावा लागतोय. वातावरण पहाता हाच प्रकार राज्यातल्या ठिकठिकाणी घडण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही."


VIDEO :...म्हणून मीही बळाचा वापर केला, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 07:27 AM IST

ताज्या बातम्या