पुण्याचा सस्पेन्स कायम, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची आणखी एक यादी

पुण्याचा सस्पेन्स कायम, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची आणखी एक यादी

  • Share this:

पुणे 31 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता फक्त 11 दिवस राहिले आहेत. मात्र काँग्रेसला अजुनही उमेदवारच सापडत नाही. रविवारी काँग्रेसने दोन नावे जाहीर केली मात्र त्यात पुण्याचं नाव नाही. केरळ आणि जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवारांची घोषणा  काँग्रेसने आज केली.

निवडणुका जशा जवळ येत आहेत तसं पुण्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण उमेदवारांच्या नावांचा घोळ अजुनही सुरुच आहे. पुण्यात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची 4 एप्रिल ही शेवटची तारीख आहे.

प्रविण गायकवाड काँग्रेसमध्ये

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात ही घोषणा करण्यात आली आहे. प्रविण गायकवाड हेही काँग्रेसच्या तिकीटाचे प्रबळ दावेदार आहेत.

दरम्यान, पुण्याच्या उमेदवारीची घोषणा संध्याकाळपर्यंत करण्यात येईल असंही मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं होतं. तर यावेळी बोलताना खर्गेंनी विरोधकांवरही टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर पुण्याच्या जागेचा तिढा अद्याप संपला नसल्याचंही ते म्हणाले.

नटरंगी नारही चर्चेत

आघाडीमध्ये जागांचा तिढा असतानाच पक्षाला बळ देण्यासाठी आता काँग्रेसमध्ये सेलिब्रेटिंचं इनकमिंग सुरू झालं आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आता नंबर लावला आहे तो लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी.सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून पुण्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध सुरेखा पुणेकर असा निवडणुकीचा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

शिंदे यांनी प्रचारही सुरू केला

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव काँग्रेसने निश्चित केलं असं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरू केला होता. पण अजुनही चर्चाच सुरू असल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे तर भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 07:34 PM IST

ताज्या बातम्या