प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला फटका, राज्यातील मातब्बर पराभवाच्या छायेत

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला फटका, राज्यातील मातब्बर पराभवाच्या छायेत

वंचितच्या दणक्याने काँग्रेस घायाळ, अशोक चव्हाणांसह सुशिलकुमार शिंदेना फटका

  • Share this:

मुंबई, 23 मे : वंचित बहुजन आघाडीने राज्यात जवळपास सर्व जागा लढवल्या आहेत. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार त्यांना एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही. असे असले तरी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबे़डकर यांच्यामुळे काँग्रेसचे मातब्बर अडचणीत आले आहेत. सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांना फटका बसला आहे. तर नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मते कमी झाली आहेत.

सोलापूरमध्ये भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत 1 लाख 16 हजार 550 मते मिळवली आहेत. काँग्रेसचे सुशिलकुमार शिंदे यांना 86 हजार 673 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना फक्त 32 हजार मते मिळाली आहेत. इथं प्रकाश आंबेडकर यांच्या मतांनी सुशिलकुमार शिंदेंना दणका दिला आहे. यामुळे जय सिद्धेश्वर महास्वामी हे 29 हजार 877 मतांनी आघाडीवर आहेत. सोलापुरात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव होईल, आणि ही जागा भाजपला मिळेल, असा न्यूज 18 च्या सर्व्हेचा अंदाज होता. तो खरा ठरत असल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून दिसत आहे.

नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 1 लाख 16 हजार 178 मते मिळाली असून ते 18 हजार 600 मतांनी पिछाडीवर आहेत. इथं भाजपचे प्रताप पाटील आघाडीवर आहेत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना 44 हजार 915 मते मिळाली आहेत. यशपाल भिंगे यांच्यामुळे काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना ही लढत जड जात आहे.

बुलडाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव 35 हजार 839 मतांनी आघाडीवर आहेत. प्रतापराव जाधव यांना 1 लाख 16 हजार 241 मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांना 80 हजार 402 मते मिळाली आहेत. इथं वंचित बहुजन आघाडीच्या बळीराम सिरस्कार यांना 35 हजार 626 मतं मिळाली आहेत.


VIDEO : सोलापुरात भीम आर्मीचा भाजपला इशारा, प्रकाश आंबेडकरांनी दिला 'हा' सल्ला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 11:44 AM IST

ताज्या बातम्या