शिरूरमधून अमोल कोल्हे जिंकण्याचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

शिरूरमधून अमोल कोल्हे जिंकण्याचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

अमोल कोल्हेंच्या विजयामागील सर्वात मोठं कारण ठरलं ते प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं एक वक्तव्य.

  • Share this:

शिरूर, 24 मे : शिरूरमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत शिवसेनेची मदार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरच होती. शिवाजीराव आढळराव याआधी 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली.

या निवडणुकीच्या निकालात अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा हा अभेद्द समजला जाणारा बालेकिल्ला सर केला आहे. डॉ. अमोल कोल्हे हे 58483 मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचं संघटन आणि स्वत:ची प्रतिमा यासोबत अमोल कोल्हे जिंकून येण्यामागे इतरही अनेक कारणं आहेत.

अमोल कोल्हेंच्या विजयामागील सर्वात मोठं कारण ठरलं ते प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं एक वक्तव्य. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख केला.

'तुमच्याविरोधात एका तगडा मराठा उमेदवार देण्यात आलाय, त्यावर तुमचं मत काय?' असा प्रश्न आढळराव यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आढळराव यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख करत ते माळी समाजाचे असल्याचं सांगितलं. त्यामुळे निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी आढळरावांनी जातीचं राजकारण केल्याची चर्चा सुरू झाली. याचाच आढळराव यांना मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ माळी समाजाचीही लक्षणीय संख्या आहे. अमोल कोल्हे यांनी मालिकेतून छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असल्याने मराठा समाजासह सर्वच समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे आढळराव यांना अमोल कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख करणं महागात पडल्याचं निकालातून दिसून आलं आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या विजयाची इतरही कारणं आहे. या मतदारसंघात शिवसेनेसोबत राष्ट्रवादीचंही चांगलं संघटन आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने अमोल कोल्हे यांचं काम केल्याचं पाहायला मिळालं. परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचं वर्चस्व असलेला हा बालेकिल्ला जिंकणं राष्ट्रवादीला शक्य झालं आहे.

शिरूर मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?

शिरुर हा लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना शिरुरचा गड राखणार का? याची चर्चा आहे.2014 च्या निवडणुकीत मोदी लाट होती. शिवसेनेने याही वेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट दिलं. त्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार मताधिक्य मिळवत राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा पराभव केला. 2009 मध्येही शिवाजीराव आढळराव पाटील यांना 4 लाख 82 हजार 563 मतं मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. 2004 पासून खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव आपली यशस्वी कारकीर्द सुरूच ठेवणार का? हा प्रश्न विचारला जात होता.

राष्ट्रवादीचाही जोर

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे लोकप्रिय असलेले कलाकार डॉ.अमोल कोल्हे यांनाही इथे मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. आधी शिवसेनेत असणाऱ्या अमोल कोल्हेंनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

वेगवेगळ्या पक्षांचं वर्चस्व

शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड, आळंदी, शिरुर, भोसरी, हडपसर, आंबेगाव आणि जुन्नर या विधानसभेच्या जागांवर वेगवेगळ्या पक्षांचं वर्चस्व आहे. या सगळ्या जागांवर राष्ट्रवादीनेही चांगलाच जोर लावला होता.


VIDEO : औरंगाबादचे नवे खासदार जलील यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2019 12:55 PM IST

ताज्या बातम्या