मुंबई, 24 मे : लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना – भाजपनं पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. देशात देखील एनडीएचं सरकार आलं. भाजपला मिळालेलं हे यश मोठं म्हणावं लागेल. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केले. पण, त्यानंतर देखील विरोधकांची धुळधाण झालेली पाहायाला मिळाली. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला तर राज्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव देखील बरंच काही सांगून जातो. अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर खरी चर्चा सुरू झाली ती विरोधक कुठं कमी पडले याची. शिवाय, शिवसेना – भाजपच्या यशामागची कारणं काय? यावर देखील आता राजकीय निरिक्षकांमध्ये चर्चा सुरू असून सामान्य माणसामध्ये देखील त्याबद्दल चर्चा सुरू आहे.
नियोजनबद्ध प्रचार
पाच वर्षे परस्परांवर टीका केल्यानंतर देखील शिवसेना – भाजपनं राज्यात युती केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह दिसून आला. शिवाय, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नियोजनबद्ध केलेल्या प्रचाराचा फायदा देखील शिवसेना – भाजपला झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेना – भाजपनं केलेला प्रचार हा नियोजनबद्ध होता.
मुख्यमंत्र्यांची क्लिन इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्लिन इमेजला देखील राज्यात फायदा झाला. मुख्यमंत्र्यांनी झंझावती प्रचार करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.
युतीचा फायदा
राज्यात शिवसेना – भाजपनं केलेल्या युतीचा फायदा देखील झाला. त्यामुळे मतांचं विभाजन टळलं. शिवसेना – भाजपनं युती केली नसती तर राज्यातील चित्र कदाचित वेगळं पाहायाला मिळालं असतं.
वंचितला मिळालेली मंत
राज्यात वंचित बहुजनचा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरला. वंचितला अपयश मिळालं असलं तरी मतांच्या विभाजनाचा फटका आघाडीला बसला असं राजकीय निरिक्षकांचं मत आहे. दलित आणि मुस्लिम हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार हे आजवरचं राजकीय गणित. पण, वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मतं पाहता मतांचं विभाजन झाल्याचं दिसून येतं.
महाराष्ट्रात मोदी लाटेसहीत मुख्यमंत्री फडणवीस यांचाही चालला करिश्मा
प्रभावी नेतृत्वाचा अभाव
मुंबईसह राज्यात विरोधकांकडे प्रभावी नेतृत्वाचा अभाव दिसला. काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी आणि उमेदवार निवडीला अपेक्षेपेक्षा जास्त लागलेला वेळ हे देखील विरोधकांच्या पराभवाचं कारण असल्याचं राजकीय पंडित म्हणतात. तर, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादीत दिसून आली.
फोल ठरलेला मनसे फॅक्टर
राज्यात राज ठाकरे यांनी निवडणुकांच्या काळात सभा घेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं. पण, मनसेची फॅक्टर फोल ठरल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी तर झाली. पण, मतांमध्ये त्याचं परिवर्तन होताना दिसलं नाही.
SPECIAL REPORT: सलग दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभव का पत्करावा लागला?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा