News18 Lokmat

जळगावात भाजप-सेनेत अखेर दिलजमाई

'पुढच्या काळात आता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सेनेला सोबत घेणार आहोत.'

News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2019 09:53 PM IST

जळगावात भाजप-सेनेत अखेर दिलजमाई

राजेश भागवत, जळगाव 2 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर वेगळी चूल मांडू पाहणाऱ्या जळगाव जिल्हा शिवसेनेनं अखेर एक पाऊल मागे घेत भाजपसोबत जमवून घेतलंय. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या शिष्टाईमुळं भाजप-सेनेत दिलजमाई झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत युती झालेली असताना जळगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपने दिलेल्या सापत्न वागणुकीचे कारण पुढे करत सोमवारी जाहीर मेळावा घेऊन भाजपचे काम न करण्याचा पवित्र घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आज शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर केली. त्यामुळे सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपण भाजपसोबत असल्याचं जाहीर केलं.

सेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि सेनेतील मतभेद मिटल्याचं जाहीर केलं. महाजन म्हणाले की, काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमची  राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती आहे. नगरमध्ये आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेतलंय. परंतु, पुढच्या काळात आता आम्ही सेनेला सोबत घेणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा फॉर्म्युला असून तो जळगाव जिल्ह्यासाठीही लागू असेल, असे महाजन यांनी सांगितले.

यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, सभागृह नेते ललित कोल्हे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...