या 3 स्त्रिया मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात देणार युतीला टक्कर

या 3 स्त्रिया मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात देणार युतीला टक्कर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज आहिर आणि शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात नरेंद्र मोदींनी पहिली प्रचारसभा घेतली. त्याच विदर्भातून 3 स्त्रिया भाजपची वाट बिकट करू शकतात.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज आहिर आणि शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात नरेंद्र मोदींनी पहिली प्रचारसभा घेतली. त्याच विदर्भातून 3 स्त्रिया भाजपची वाट बिकट करू शकतात.

चारुलता टोकस, नवनीत राणा आणि वैशाली येडे या तीन महिला उमेदवार भाजपची मतं कमी करू शकतात, असं बोललं जात आहे. तिघीही वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, हे विशेष.

वैशाली येडे हे नाव या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळं म्हणून पुढे आलं आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी म्हणून वैशाली येडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी लढा उभारला. मराठी साहित्य संमेलनात आयत्या वेळी वैशाली येडे यांना निमंत्रण देण्यात आलं आणि त्यांनी नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यावरून वादंग उठला असताना वैशाली येडे यांनी त्यांच्या जागी भाषण केलं आणि ते गाजलं. शेतकऱ्याच्या पत्नीचं मनोगत अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरलं. तेव्हापासून वैशाली यांचं नाव महाराष्ट्रात गाजत आहे.

वैशाली येडे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्याकडे निवडणुकीसाठी पैसे नाहीत, असं सांगत वैशाली यांनी मला दोन्ही द्या नोट आणि वोट असं आवाहन केलं.

त्यांचं हे आवाहन सोशल मीडियावरून सर्वदूर पसरलं आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा पत्नी निवडणुकीला उभी राहते आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं आश्वासन देते, यावर सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. येडे यांच्या अपीलला प्रतिसादही मिळाला आणि दीड लाख रुपये मिळाले अशी वृत्तही प्रसिद्ध झाली आहेत.

नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युवा स्वाभिमानी पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक लढवत आहेत आणि भाजप-सेना युती यांच्यापुढे त्यांचं कडवं आव्हान असणार, अशी चर्चा आहे.  आनंद अडसूळ या शिवसेनेच्या खासदारांविरोधात नवनीत राणा उभ्या आहेत.

यापैकी चारुलता टोकस या वर्ध्याच्या जागेसाठी लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच ठिकाणाहून सोमवारी महाराष्ट्रातल्या प्रचाराचा नारळ फोडला. वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस गेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या दत्ता मेघेंना हरवून निवडून आले होते. आता दत्ता मेघे स्वतः भाजपत सामील झाले आहेत. काँग्रेसने ही जागा चारुलता टोकस यांना दिली आहे. काँग्रेसच्या माजी प्रभारी प्रभा राव यांच्या चारुलता टोकस या कन्या. वर्ध्यातूनच काँग्रेसच्या तिकिटावर प्रभा राव यांनी 1999 ची निवडणूक जिंकली होती. आता त्यांची मुलगी नशीब आजमावणार आहे.

विशेष म्हणजे विदर्भातून भाजप- सेना युतीची एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहे - भावना गवळी.

विदर्भातल्या प्रमुख लढती

नागपूर -  नितीन गडकरी (भाजप), नाना पटोले (काँग्रेस)

चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप),  सुरेश धानोकर (काँग्रेस)

यवतमाळ वाशिम - भावना गवळी (शिवसेना), माणिकराव ठाकरे (काँग्रेस) आणि वैशाली येडे (प्रहार)

बुलढाणा - प्रतापराव जाधव (सेना), राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

अमरावती - आनंद अडसूळ (सेना), नवनीत राणा (युवा स्वाभिमानी पक्ष)

अकोला - संजय धोत्रे (भाजप), हिदायत पटेल (काँग्रेस), प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)

भंडारा गोंदिया - सुनील मेंढे (भाजप), नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)

गडचिरोली चिमूर - अशोक नेते (भाजप), नामदेव उसेंडी (काँग्रेस)

वर्धा - रामदास तडस (भाजप), चारुलता टोकस (काँग्रेस)

रामटेक - कृपाल ताम्हाणे (सेना), किशोर गजभिये (काँग्रेस)


VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 06:21 PM IST

ताज्या बातम्या