अवैध दारू विक्रीच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांची मस्ती उतरविणार - मुख्यमंत्री

अवैध दारू विक्रीच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांची मस्ती उतरविणार - मुख्यमंत्री

'चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून संसदेत दूध वालाच निवडून जाणार आहे, दारूवाला नाही.'

  • Share this:

भास्कर मेहेरे, वणी, 4 एप्रिल : अवैध दारू विक्रीच्या भरवश्यावर मस्ती करणाऱ्यांची मस्ती उतरवू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी त्यांची वणीत सभा झाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्यावर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री म्हणाले, अवैध दारू विकणाऱ्यांची मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदा करू. संसदेत दूध वालाच निवडून जाणार आहे, दारूवाला नाही असंही ते म्हणाले. इथे दूधवाला चालेल, दारूवाला नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांना टोला लगावला.

या भागात अवैध प्रकारे दारू विक्री करून जमविलेला पैसा आता निवडणुकीत खर्च केल्या जात आहे. अशावेळी कायद्याची पळवाट शोधून काढणाऱ्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदा करून बंधन आणू असेही मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भात सिंचन रस्ते प्रकल्पात ५० वर्षात झाले नाही त्यापेक्षा अधिक कामे ५ वर्षात झाली असून देशात आणि महाराष्ट्रात विदर्भाचं विचार करणारं सरकार हवं आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सभांचा धडाका

लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी देखील 8 सभा घेणार आहेत. अर्थात यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील जोरदार प्रचार करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 मतदारसंघात प्रत्येकी दोन सभा मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रचाराची मुख्य जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच असणार आहे. म्हणून निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन सभा म्हणजेच येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री साधारणत: 98 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी काही सभा एकत्र घेतल्या होत्या. पण यापुढे दोन्ही नेते स्वतंत्र सभा घेणार आहेत.

मोदी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PM मोदींच्या शेवटच्या सभेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित व्यासपीठावर दिसणार आहेत. तर संयुक्त मेळावे आणि सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता याव्यात यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 10:57 PM IST

ताज्या बातम्या