पीकविमा अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख; शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा

आजही उशीरापर्यंत पीकविम्यासाठी बँका चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2017 09:53 AM IST

पीकविमा अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख; शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा

 31 जुलै: पीकविम्यासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राज्यभर काल रात्री अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बँकांबाहेर रांगा लावल्या आहेत. आजही उशीरापर्यंत पीकविम्यासाठी बँका चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नांदेड , सोलापूर, हिंगोली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर बँक आणि सेतु सुविधा केंद्रांबाहेर मुक्काम करावा लागतोय. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडला तर रात्रभर महिला आणि पुरुष शेतकरी बँक तसंच सेतु केंद्रांबाहेर मुक्काम ठोकून होते. पीकविमा भरण्याची आज म्हणजे सोमवारी शेवटची तारीख असल्यामुळे ही विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून विमा भरण्यासाठी शेतकरी बँकाबाहेर रांगा लावत आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी गर्दीतल्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला. तर भोकरमध्ये बँकेच्या रांगेमध्ये एका तरूण शेतक-याचा मृत्यू झाला.

तरीसुद्धा विमा भरण्यासाठी मात्र शेतकऱ्यांच्या रांगा वाढतच आहेत. आता मुदत संपत असल्यानं आपला विमा भरला जाण्याबद्दल अनेक शेतकरी साशंक आहेत. पीकविमा भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरण्याची सक्ती आहे . पण त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यानं फॉर्म भरण्यास वेळ लागतोय. परिणामी महिला, वृद्ध शेतकऱ्यांना रांगेत ताटकळत बसावं लागतंय.

एकीकडे राज्यभर पीकविम्यासाठी राज्यभर शेतकरी धडपडत आहेत तर दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात विम्यासाठी फक्त 5 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. विम्यासाठी जी प्रक्रिया आहे त्यामध्ये अनेक जाचक अटी आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचं चित्र पहायला मिळतं आहे.

पीकविमा भरण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत सरकारने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...