29 नोव्हेंबर : अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील निर्भयाला अखेर न्याय मिळालाय. तिन्ही दोषी जितेंद्र शिंदे,संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेला अहमदनगर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यभरात समाधान व्यक्त केला जात आहे.
13 जुलै 2016 ला नगर येथील कोपर्डीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तीन नराधमांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करण्यात आला. एकाच वर्षात या प्रकरणाचा निकाल आज लागलाय. तिन्ही आरोपींना 18 नोव्हेंबर 2017 ला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलंय. आज या तिन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलीये.
मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला विनयभंग प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा बलात्कार प्रकरणी जन्मठेप आणि 20 हजारांचा दंड आणि खून, बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. तर
सहआरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेला बलात्काराचा कट रचणे, मुख्य आरोपीला मदत करणे यासाठी जन्मठेप, 20 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. तसंच मुख्यआरोपीला खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगायच्या आहेत असं नमूद करत कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलीये.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर पीडित मुलीच्या आईने कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त केलं. तसंच सरकारी वकील उज्ज्वल निकम, मराठा क्रांती संघटनेचेही त्यांनी आभार व्यक्त केले. माझ्या छकुलीला न्याय मिळालाय पण माझी छकुली मला भेटली नाही अशी प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले.
मुख्य आरोपीवर कोणते गुन्हे सिद्ध ?
- कलम 302 - खून
- कलम 376 - बलात्कार
- कलम 120 (ब) - गुन्हेगारी कट रचणे
- पॉस्को कायद्याअंतर्गत 3 कलमं
- फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते
सह-आरोपींवर कोणते गुन्हे सिद्ध ?
- कलम 120 (ब) - गुन्हेगारी कट रचणे
- कलम 109 - गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे
- कलम 354 - छेडछाड
- पॉस्को कायद्याअंतर्गत 3 कलमं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा