कोंढवा संरक्षण भिंत दुर्घटना.. बिल्डर अग्रवाल बंधूंना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

कोंढवा संरक्षण भिंत दुर्घटना.. बिल्डर अग्रवाल बंधूंना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

सन 2013 मध्ये बांधलेल्या संरक्षण भिंतीच्या दुरूस्तीसाठी वारंवार बिल्डरला पत्र देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती. मात्र, बिल्डरनी याकडे दुर्लक्ष केले.

  • Share this:

पुणे, 30 जून- कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली अॅल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 17 जणांच्या मृत्यू प्रकरणी विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल या बिल्डर बंधूंना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. कोर्टाने दोघांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी प्रकरणी या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-64) यांनी पुण्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्विकारली आहे. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या 17 कामगारांचे मृतदेह पहाटे एअरफोर्सच्या विमानाने दिल्ली आणि पाटण्याला रवाना करण्यात आले.

विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आले. सन 2013 मध्ये बांधलेल्या संरक्षण भिंतीच्या दुरूस्तीसाठी वारंवार बिल्डरला पत्र देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती. मात्र, बिल्डरनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे 17 कामगारांचा निष्पाप जीव गेला. बिल्डरने सोसायटी हॅंडओव्हर केलेली नसल्याने संरक्षण भिंतीच्या दुरूस्तीची जबाबदारी ही बिल्डरची आहे. असा आरोप अगरवाल बिल्डरवर करण्यात आला आहे.

कॉंग्रेसने केली ही मागणी..

पुण्यातील भिंत पडण्याच्या घटनेमध्ये 17 कामगारांचा निष्पाप जीव गेला आहे. त्यामुळे या प्रकरणात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच राज्य सरकारच्या अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज असून या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे.

बिल्डर्सविरोधात गुन्हा..

Loading...

या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत, असा आरोप होत आहे. या प्रकरणी अॅल्कॉन लॅंडमार्कस रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर जगदिशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-64), सचिन जगदिशप्रसाद अगरवाल (वय-34), राजेश जगदिशप्रसाद अगरवाल (वय-27), विवेक सुनील अगरवाल (वय-21), विपुल सुनील अगरवाल (वय-21) तसेच कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रक्टर विरोधात कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षक भिंत कमकुवत, बेकायदेशीर होती. मजुरांच्या सुरक्षित निवाऱ्याची काळजी न घेणारे बिल्डर आणि निष्क्रिय पालिका अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

मृतांमध्ये 4 महिलांसह 2 चिमुरड्यांचा समावेश...

कोंढवा बुद्रुक येथील अॅल्कॉन स्टायलस सोसायटीच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्यांच्या खोल्यावर रात्री दोनच्या सुमारास अॅल्कॉन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असल्याने खालच्या बाजूला असलेल्या कामगारांच्या खोल्यांवर पडली. त्याखाली दबून 15 कामगारांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 महिला आणि 2 मुलांसह 15 जणांचा समावेश आहे. सगळे गाढ झोपेत असताना शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. सर्व मृत बिहार राज्यातील कटिहार येथील रहिवासी होते.

बिहारमध्ये पडसाद...

पुण्यातील या घटनेचन बिहारमध्ये पडसाद उमटले आहे. कटिहारमधील बलरामपूर पोलिस ठाणे क्षेत्रातील बघार गावांतील हे सर्व कामगार होते. बघार गावावर शोककळा पसरली आहे. कटिहारचे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बघार गावात अधिकाऱ्यांना पाठवले आहे. दरम्यान, हे कामगार जरी बाहेरच्या राज्यातील असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कामगारांचे मृतदेह त्यांच्या गावी विमानाने पाठवले जातील, असेही राज्य सरकारने सांगितले आहे.

NDRF कडून मदत जाहीर

घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना NDRF कडून 4 लाखांची मदत जाहीर केली आहे.

कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, 'बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.'

VIDEO:पुण्यात साखर झोपेत असलेल्या 17 जणांवर काळाचा घाला; घटनास्थळाचा आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: #Punepune
First Published: Jun 30, 2019 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...