खडसेंवर 'एसीबी'ची टांगती तलवार कायम?

खडसेंवर 'एसीबी'ची टांगती तलवार कायम?

भोसरी एमआयडीसी गैरव्यवहार प्रकरणी न्या. दिनकर झोटिंग समितीने आपला अहवाल सरकारला सादर केलाय. त्यात खडसेंविरोधात फौजदारी कारवाई न करण्याचे संकेत दिले गेल्याचं बोललं जातंय, जरी समजा झोटिंग समितीच्या अहवालातून खडसेंना क्लीनचीट मिळाली तरी खडसेंवर एसीबीच्या कारवाईची टांगती तलवार यापुढेही कायम असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : भोसरी एमआयडीसी गैरव्यवहार प्रकरणी न्या. दिनकर झोटिंग समितीने आपला अहवाल सरकारला सादर केलाय. त्यात खडसेंविरोधात फौजदारी कारवाई न करण्याचे संकेत दिले गेल्याचं बोललं जातंय, पण एसीबीने खडसेंविरोधात यापूर्वीच तक्रार दाखल करून घेतली असल्याने त्यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे. त्यामुळे खडसेंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काहिशी साशंकता व्यक्त केली जातेय.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी एमआयडीसीमध्ये जमीन खरेदी केल्याची बाब दडवून ठेवली होती. ही बाब उघड होताच त्यांना गेल्यावर्षी मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. याच गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती. याच समितीचा चौकशी अहवाल नुकताच सरकारला सादर झालाय. या अहवालात खडसेंना क्लीनचीट दिली गेलीय की नाही याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी या अहवालात खडसेंवर मंत्रीपदाचा गैरवापर केल्याबाबत काही ताशेरे ओढले असल्याचे समजते. पण फौजदारी कारवाईबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिले गेले नसल्याचं सांगितलं जातंय.

त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची चर्ची पुन्हा सुरू झालीय पण भोसरी एमआयडीसी गैरव्यवहार प्रकरणातच एसीबीने हेमंत गावडे यांची तक्रार यापूर्वीच दाखल करून घेतलेली आहे. त्यामुळे जरी समजा झोटिंग समितीच्या अहवालातून खडसेंना क्लीनचीट मिळाली तरी खडसेंवर एसीबीच्या कारवाईची टांगती तलवार यापुढेही कायम असणार आहे.

दरम्यान, सरकारला चौकशी आयोगाचा अहवाल मिळाला आहे. त्याचा अभ्यास करून उचित निर्णय घेतला जाईल आणि तो योग्य वेळी जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 02:38 PM IST

ताज्या बातम्या