News18 Lokmat

अखेर सेना-भाजपने घेतला 'मुका', नाट्यमय घडामोडीनंतर केडीएमसीचं महापौरपद सेनेकडे !

संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की, भाजपने आता मुका दिला तरीही आम्ही युती करणार नाही. मात्र कल्याण डोंबिवलीत सेना भाजपने एकमेकांचा मुका घेतल्याचं दिसून आलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 5, 2018 08:56 PM IST

अखेर सेना-भाजपने घेतला 'मुका', नाट्यमय घडामोडीनंतर केडीएमसीचं महापौरपद सेनेकडे !

डोंबिवली, 05 मे : "भाजपने आता मुका दिला तरीही आम्ही युती करणार नाही" असं शिवसेनेचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. पण ऐनवेळी केडीएमसी महापौर उपमहापौर पदासाठी शिवसेना भाजपने एकमेकांचा मुका घेतलाय.

उल्हासनगर महापालिकेच्या वाटाघाटींवर भाजपने सेनेला केडीएमसीचे महापौरपद सोडण्यास तयार झाली आहे. त्यानुसार आज शिवसेना भाजपच्या उमेदवारांनी एकत्रितपणे महापौर, उपमहापौर पदासाठी आपले अर्ज दाखल केले. यावेळी जोरदार 'युतीचा विजय असो' अशी घोषणाबाजी करण्यात आली. मात्र थोड्याच वेळात शिवसेना सहयोगी कासिफ तानकी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली.

त्यामुळे भाजप उमेदवार उपेक्षा भोईर यांनीही महापौरपदाचा अर्ज दाखल केल्याने अल्पावधीतच युतीतील बेबनाव समोर आला. परंतु, दीड तासाच्या वादळी चर्चेनंतर सेना आणि भाजपने एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत आमची युती कायम असल्याचे सांगितलं.

डोंबिवलीत खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की, भाजपने आता मुका दिला तरीही आम्ही युती करणार नाही. मात्र कल्याण डोंबिवलीत सेना भाजपने एकमेकांचा मुका घेतल्याचं दिसून आलं. याबाबत भाजप गटनेते वरूण पाटील यांनी सांगितले की, "सेनेला महापौरपद मिळाल्याने नाराजी नाही मात्र निराशा आहे." तर उपमहापौर पदाच्या भाजप उमेदवार उपेक्षा भोईर यांनी सांगितलं की," महापौरपदाची आशा सर्वाना होती. त्यामुळे निराशा होणे स्वाभाविक आहे."

या सर्व प्रकाराबाबत सारवासारव करीत गोपाळ लांडगे यांनी सांगितलं की, "महापौर हा सेनेचा तर उपमहापैर हा भाजपचाच बनणार. ज्या काही नाट्यमय घडामोडी झाल्या त्या चुकून फॉर्म भरल्यामुळे झाल्या. महापौर पदाबाबत कुठेही निराशा नाही. एकीकडे केंद्रात, राज्यात युती करणार नाही असे शिवसेना सांगत असली तरी विधानपरिषदेपाठोपाठ आता कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदासाठी मात्र सेना भाजपने युती केल्याचे दिसून आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2018 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...