नागपुरात जेटचे कार्यालय सुरू, पण उड्डाण मात्र बंद; 22000 कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात...

नागपुरात जेटचे कार्यालय सुरू, पण उड्डाण मात्र बंद; 22000 कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात...

जेटला वाचवण्यासाठी कंपनीने बँकांकडून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण बँकांनी त्यास नकार दिला. उड्डाण बंद झाल्यामुळे जेटचे 16 हजार नियमीत कर्मचारी आणि 6 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून जेटच्या कर्मचाऱ्यांना पगारच दिला नाही.

  • Share this:

हर्षल महाजन, नागपूर, 18 एप्रिल- जेट एअरलाईन्स कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेज कंपनीचे कार्यालय सुरू आहे, पण उड्डाणांचे संचालन बंद झाले आहे.

जेटची नागपुरातून मुंबई, दिल्ली, अलाहाबाद आणि इंदूरसाठी दररोज सात विमाने होती. दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अलाहाबादला सुरू असलेले एकमेव उड्डाण रद्द करण्यात आले होते. आता तर सर्वच उड्डाणाचे संचालन बंद झाले आहे. अलाहाबादची सर्व उड्डाण 5 मेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. कंपनीचे मुंबईला तीन, दिल्लीसाठी दोन आणि अलाहाबाद व इंदूरकरिता एक-एक उड्डाण होते. फेब्रुवारीत मुंबईचे दोन आणि दिल्लीचे दोन उड्डाण 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले होते. एप्रिलमध्ये सुरू झाल्यानंतर पुन्हा टेक ऑफ झाले नाही. त्यानंतर हळुहळू सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. यादरम्यान अनेक प्रवासी विमानतळावर पोहोचतात आणि नाराजी व्यक्त करतात. पूर्वी बुकिंग केलेल्यांना रिफंड देण्यात येत आहे तर काहींना दुसऱ्या कंपनीच्या विमानात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जेटने विदेशातील सर्व उड्डाणेही बंद केली आहेत. गुरुवारी कंपनीच्या विमानांची संख्या 14 वर आली आहे. पूर्वी कंपनीच्या ताफ्यात 123 विमाने होती. आर्थिक संकटामुळे वैमानिकांचे वेतन देण्यास कंपनी असमर्थ आहे. याशिवाय सोशल मीडियावर तक्रारी येत आहे. उड्डाण नसल्यामुळे कंपनीच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याच्या शक्यतेमुळे नागपूर विमानतळावरील काऊंटर बंद झाले आहे. उड्डाणे बंद असल्यामुळे कंपनीचे कर्मचारी नाराज आहे. त्यांना रोजगार हिरावण्याची भीती सतावत आहे. त्यानंतरही उड्डाणे पुन्हा सुरू होऊन सर्वकाही ठीक होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

22000 कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात...

गेल्या दशकभरात किंगफिशरनंतर सेवा बंद करणारी जेट ही दुसरी कंपनी ठरली आहे. याआधी विजय मल्ल्याची किंगफिशर ही विमान कंपनी 2012 मध्ये बंद झाली होती. आता 26 वर्षे सेवा देणा-या जेट एअरवेजने आपल्या सेवा बंद केल्या आहेत. एकेकाळी 650 उड्डाण करणारी या कंपनीला बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता आले नाही. अर्थात आता कंपनीने सेवा बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा फाटका बसला आहे. 22 हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात आहे. त्यात 16 हजार नियमीत तर 6 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातच जेटचे समभाग देखील 27 टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत.

जेटला वाचवण्यासाठी कंपनीने बँकांकडून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण बँकांनी त्यास नकार दिला. उड्डाण बंद झाल्यामुळे जेटचे 16 हजार नियमीत कर्मचारी आणि 6 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून जेटच्या कर्मचाऱ्यांना पगारच दिला नाही. धक्कादायक बाब म्हणजे जेटने सेवा बंद करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना सांगितलाच नाही. जेट उड्डाण बंद करणार आहे, ही बातमी कर्मचाऱ्यांना प्रसारमाध्यमांकडून कळाली होती. दरम्यान, जेटच्या व्यवस्थापनाने कोणतीच कल्पना दिली नसल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पगार मिळण्यासाठी कायदेशी व रस्त्यावरची लढाई लढू असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

8500 कोटींचे कर्ज

जेट एअरवेजवर एकूण 26 बँकांचे तब्बल 8 हजार 500 कोटींचे कर्ज आहे. यातील काही बँका खासगी आणि परदेशातील आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विचार करता यात कॅनरा, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, अलहाबाद बँक, एसबीआय आणि पीएनबीचा समावेश आहे. तर यस बँक आणि आयसीआय या खासगी बँकांकडून जेटने कर्ज घेतले आहे. 2010 च्या आर्थिक संकटानंतर जेट डबघाईला आले. तेव्हा कंपनीला सलग चार तिमाहीत तोटा झाला होता. त्यानंतर जेटचे कर्जाचे हप्ते थकले.


SPECIAL REPORT: तुमच्या मोबाईलमधून टिक टॉक अ‍ॅप होणार गायब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 05:54 PM IST

ताज्या बातम्या