...तर शेतकऱ्यांचा कापूस सरकार खरेदी करेल - गिरीश महाजन

...तर शेतकऱ्यांचा कापूस सरकार खरेदी करेल - गिरीश महाजन

कापसाचा भाव ५७०० रुपया पेक्षा कमी झाल्यास कापूस आता शेतकऱ्यांचा कापूस सरकार खरेदी करणार असल्याची हमी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

  • Share this:

जळगाव, 17 नोव्हेंबर : कापसाचा भाव ५७०० रुपया पेक्षा कमी झाल्यास कापूस आता शेतकऱ्यांचा कापूस सरकार खरेदी करणार असल्याची हमी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसंच दुष्काळाचं कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारं २० टीएमसी पाणी लवकरच नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणा नदीत सोडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाचोरा तालुक्यात आयोजित कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांच्यापुढे बोलताना महाजन यांनी हे आश्वासन दिले.


पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अमोल शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने किसान कृषी प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. या कृषी प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत देण्याच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, भाजप सरकार हे पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शासनाने नुकत्याच स्वीकारलेल्या स्वामिनाथन आयोगामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला दीड पट किंमत मिळत आहे.


५७०० रुपये या बाजारभावापेक्षा कापसाचा भाव कमी झाला, तर शेतकऱ्यांचा कापूस सरकार खरेदी करेल असं आश्र्वासन त्यांनी यावेळी दिलं. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असंही ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातली दुष्काळी परिस्तिति पाहता, समुद्रात वाहून जाणारं २० टीएमसी पाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणा नदी पात्रात आणण्याच्या हालचाली सरकारने सुरु केल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या कामासाठी गुजरात सरकारशी करार करण्यात आला असून, हे पाणी वळविण्यात आल्यावर जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्तितीत निश्चितच सुधारणा होईल. हा मोठा बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीने लक्ष देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.


या कृषी प्रदर्शनाला 'नाम फाउंडेशन'चे मकरंद अनासपुरे हे देखील उपस्थित होते. यंदाचा दुष्काळ अतिशय कठीण आणि गंभीर स्वरूपाचा असल्यानं 'नाम फाउंडेशन'ने यासाठी काम करण्याचं निर्णय घेतला असल्याचं अनासपुरे म्हणाले. दुष्काळ निवारण्यासाठी नामला जे-जे करण्या सारखं आहे ते-ते सर्व प्रयन्त 'नाम'च्यावतीने करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रश्न गंभीर असल्याने पहिल्या टप्प्यात चाऱ्याचा पश्चिम महाराष्ट्रातील चारा मराठवाडा किंवा विदर्भात नेता येईल का या विषयी नाम प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणला.


यावेळी आपल्या खास विनोदी शैलीत बोलताना अनासपुरे म्हणाले की, यंदा दुष्काळ कठीण असला तरी त्याची तीव्रता तितकीशी जाणवणार नाही. त्याला कारण तसंच आहे, ते म्हणजे आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधान सभेच्या निवडणुका. वास्तविक पाहता दुष्काळ पडल्यानंतरच निवडणूक घ्यायला हव्यात, म्हणजे दुष्काळाचा त्रास जनतेला होणार नाही असा मार्मिक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.


पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अमोल शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या द्विदिवसीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचं यावेळी प्रमुख आयोजन अमोल शिंदे यांनी सांगितले.


 VIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2018 09:03 PM IST

ताज्या बातम्या