३० पर्यंत पाढे म्हणा आणि गणपतीची वर्गणी घेऊन जा

३० पर्यंत पाढे म्हणा आणि गणपतीची वर्गणी घेऊन जा

गणपतीची वर्गणी हवी असेल तर आता तुम्हाला पाढे येणे आवश्यक आहेत

  • Share this:

जळगाव, ०७ सप्टेंबर- गणपतीची वर्गणी हवी असेल तर आता तुम्हाला पाढे येणे आवश्यक आहेत. आता तुम्ही म्हणाल की पाढे तर आम्हाला येतात. २ ते १५ पर्यंतचे पाढे आम्हाला येतात, तर आम्ही ते म्हणू. पण फक्त १५ पर्यंत किंवा २० पर्यंत पाढे येऊन चालणार नाहीत. तर ३० पर्यंत तुम्हाला पाढे आले तरच तुम्हाला वर्गणी मिळेल. जामनेर येथील जडे बंधू ज्वेलर्सने ३० पर्यंत पाढे येणाऱ्यांना १०१ रुपयांची वर्गणी मिळेल असा चक्क बोर्ड लावला आहे. वर्गणी देण्यासाठी जडे बंधू ज्वेलर्सनी राबलेल्या या अनोख्या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय. त्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठी सर्वच मंडळं तयारीला लागली आहेत. गणेशोत्सवाची तयारी सुरु होते ती वर्गणी गोळा करण्यापासून. त्यामुळे सर्वच मंडळं वर्गणी गोळा करण्याच्या कामाला लागलीयेत. मात्र या वर्गणीबाबत जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जडे बंधू ज्वेलर्सने एक अनोखा उपक्रम राबवलाय. तो म्हणजे पाढे म्हणून दाखवायचा. वर्गणी देण्यासाठी त्यांनी एक अट ठेवलीय आणि ही अट म्हणजेच ३० पर्यंतचे पाढे आलेच पाहिजेत आणि तसा बोर्डही त्यांनी लावलाय.

शहरातील गणेश मंडळं वर्गणी घेण्यासाठी आल्यानंतर जडे बंधू प्रथम त्यांना ३० पर्यंतचे पाढे म्हणायला सांगतात आणि पाढे बरोबर आले तरच वर्गणी देतात अन्यथा नाही. गेल्या काही दिवसांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत. अनेकवेळा मंडळं त्यांच्याकडे वर्गणी घेण्यासाठी आलीत मात्र पाढे न आल्यामुळे वर्गणी न घेताच गेल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या जडे बंधूंच्या या उपक्रमाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय तर गणेशोत्सव मंडळांकडून मात्र या उपक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

VIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 10:50 AM IST

ताज्या बातम्या