जळगाव घरकुल घोटाळा: 'त्या' दोघांविरुद्ध अटक वॉरंट रद्द.. पत्रकाराची कॉलर पकडली

बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी कोर्ट क्रमांक 2 मध्ये सुनावणी झाली. सर्व संशयीत आरोपी शुक्रवारी झालेल्या सुनावणीली हजर होते. मात्र एक आरोपी गैरहजर होता.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 03:33 PM IST

जळगाव घरकुल घोटाळा: 'त्या' दोघांविरुद्ध अटक वॉरंट रद्द.. पत्रकाराची कॉलर पकडली

दीपक बोरसे/राजेश भागवत, (प्रतिनिधी)

धुळे, 7 जून- बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी कोर्ट क्रमांक 2 मध्ये सुनावणी झाली. सर्व संशयीत आरोपी शुक्रवारी झालेल्या सुनावणीली हजर होते. मात्र एक आरोपी गैरहजर होता. संशयितांमध्ये सुरेश जैन, गुलाबराव देवकर, प्रदीप रायसोनी, राजा मयूर यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 27 जून रोजी धुळे कोर्टात होणार आहे. तसेच मागच्या तारखेला गैरहजर असलेल्या दोन संशयीतांना कोर्टाने प्रतेकी 4 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यादरम्यान कोर्टाच्या आवारात पोलिसांनी पत्रकारांना अरेरावी करत धक्काबुक्की केली एवढेच नाही तर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीची कॉलर पकडून त्याला वार्तांकनापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. न्यायाधीश सृष्टी निळकंठे या आजारी असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी न्यायाधीश उगले यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले.

पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पत्रकार संघाने केली आहे. धुळे जिल्हा पत्रकार संघाचे या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना दिले आहे.

यांचे पकड वॉरंट रद्द..

आरोपी अजय जाधव आणि अरुण शिरसाळे यांचे पकड वॉरंट रद्द करून कोर्टाने त्यांना 4 हजाराचा दंड ठोठावला आहे. घरकुल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रदीप रायसोनी यांना 12 आणि 13 जूनला जळगावला जाण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे.

Loading...

काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?

'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती.

मात्र, या योजनेतील सावळागोंधळ सन 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर तीन फेब्रुवारी 2006 रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली.

या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी अशा एकूण 90 जणांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन आणि संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनही मार्च-एप्रिल 2008 पर्यंत घरकुल गैरव्यवहारातील संशयितांना अटक झाली नव्हती. संशयितांचे राजकीय वजन, त्यांचा दबाव, पोलीस अधिकाऱ्यांची चालढकल, तपासी अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे सहा वर्षे हा तपास रेंगाळला. जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा विषय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उचलून धरल्यानंतर या प्रकरणातील संशयितांचे अटकसत्र सुरू झाले. सुरेश जैन यांना या प्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. अधिकृतपणे साडेचार वर्षे कारागृहात असलेले सुरेश जैन यांनी शिक्षेतला बराच काळ आजारपणाच्या नावाखाली आलेशान रुग्णालयात ऐशोआरामात काढला होता.


महापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...