10 नोव्हेंबर : शिक्षणाचे माहेर घरं असलेल्या पुण्यात पुणे विद्यापिठाने अजब फतवा जाहीर करून वाद निर्माण केलाय. सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी, निर्व्यसनी बना असं पत्रकच पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलंय.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फक्त शाकाहारी विद्यार्थीच सुवर्णपदकावर हक्क सांगू शकतील असा नवा 'शैक्षणिक निकष' निर्माण करून आपले जगावेगळे शहाणपण दाखवून दिलंय. अशा विद्यार्थ्याला जो शाकाहारी आहे आणि निर्व्यसनी आहे त्याला ‘योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यात येणार आहे.
विज्ञानशाखेच्याच विद्यार्थ्यांसाठी सुवर्णपदक देण्यात येणार आहे. सुवर्णपदकासाठी अटींची जंत्रीच विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन केलं आहे.
एवढंच नाहीतर विज्ञानशाखेचा विद्यार्थी सुवर्णपदकासाठी पात्र असेल. विद्यार्थी १०, १२ वी आणि पदवी परीक्षेत प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा आणि ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल अशी अटही पुणे विद्यापीठाने घातलीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा