'युती' झाली नाही तर शिवसेना एकटी पडणार का?

'युती' झाली नाही तर शिवसेना एकटी पडणार का?

काँग्रेस-राष्ट्रवादीला मित्रपक्ष आहेत. भाजपसोबतही काही मित्रपक्ष आहे. युतीचं जमलं नाही तर शिवसेनेला एकटं लढावं लागणार आहे.

  • Share this:

मुंबई 13 फेब्रुवारी : लोकसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येताहेत तसं राजकारणाचे रंगही बदलत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि नरेंद्र मोदींच्या उदयानंतर या बदलाला सुरुवात झाली. काही वर्षांपर्यंत राष्ट्रवादीवर तुटून पडणारी मनसे आता हातावर घड्याळ बांधण्याची शक्यता आहे. तर घडाळ्याची टीक टीक वाढावी यासाठी इंजिनही मदतीला येणार याची चर्चा सुरू झालीय. असं झालं आणि युतीचं गणित फिस्कटलं तर शिवसेना निवडणुकीत एकटी पडण्याची शक्यता आहे.


युती होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी करत मित्र पक्षही मिळवले आहेत. तर अनेक जागेचे उमेदवारही निश्चित झाले आहेत. राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी पक्षाने आधीच या आघाडीसोबत हातमिळवणी केलीय. तर वंचित बहुजन आघाडीशीही बोलणी सुरू आहे. हे नवे पक्ष जोडत असतनाच आता मनसेचा पाठिंबा मिळविण्याचा  राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.


काही महिन्यांपूर्वी पुण्यात राज ठाकरेने घेतलेल्या शरद पवारांच्या बहुचर्चित मुलाखतीनंतर मनसे आणि राष्ट्रवादी जवळ यायला सुरुवात झाली. भाजपचं आव्हान समोर असल्याने मनसेसाठी ही लढाई अटीतटीची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी जवळीक साधली तर काही फायदा होण्याची शक्यता मनसेला वाटते आहे.


तर भाजपसोबत महादेव जानकर, विनायक मेटे, रामदास आठवले, सदाभाऊ खोत यांचे पक्ष असल्याने भाजपला मित्र पक्ष मिळाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, भाजपकडे असलेले काही मित्रपक्ष, मनसेची राष्ट्रवादीशी होत असलेली जवळीक या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत सध्यातरी कुठलाही मित्रपक्ष नाही.


स्वबळावर निवडणुक लढण्याची शिवसेना कितीही गर्जना करत असली तरी एकट्याच्या जीवावर किती जागा जिंकेल हा खरा प्रश्न आहे. शिवसेनेच्या खासदारांनीही युती करा नाहीतर सध्या आहे तेवढ्या जागाही निवडून येणार नाहीत अशी भीती अंतर्गत बैठकांमध्ये व्यक्त केली होती.


तर युती झाली नाही तर त्याचा फटका भाजप आणि शिवसेनेलाही बसेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणेच म्हटलं होतं. त्यामुळे जागांसाठी शिवसेना कितीही दबाव आणत असली तरी भाजप एवढीच गरज शिवसेनलाही आहे.


आमचं शिवसेनेवर खुलं तर शिवसेनेचे आमच्यावर छुपं प्रेम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले होते. तर सोबत न येणाऱ्यांना पटक देंगे असा इशारा अमित शहांनी दिला होता. तर मोठा भाऊ शिवसेनाच आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपात युतीचं फिस्कटलं तर शिवसेनेला स्वबळावर लढावं लागणार आहे.

SPECIAL REPORT : भाजप आमदार पत्नीचं 'माझ्या नवऱ्याची बायको'



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 08:43 PM IST

ताज्या बातम्या