उद्धव ठाकरेंना कानठळ्या बसल्या; 'या' हॉटेलवर आली संक्रांत

ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली त्या हॉटेललाच टाळं ठोकण्याची कारवाई शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 15 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे ऐन ख्रिसमसच्या हंगामात हॉटेल मालकाला हॉटेल बंद असल्यामुळे प्रचंड तोटा होतो आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 12:30 PM IST

उद्धव ठाकरेंना कानठळ्या बसल्या; 'या' हॉटेलवर आली संक्रांत

महाबळेश्वर, 25 डिसेंबर: विश्रांतीसाठी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय  महाबळेश्वरला गेले असता शेजारच्या हॉटेलमध्ये चालू असलेल्या वरातीचा त्रास झाला म्हणून चक्क ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली त्या हॉटेललाच  टाळं ठोकण्याची कारवाई शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 15 दिवसांपूर्वी  घडलेल्या या घटनेमुळे ऐन ख्रिसमसच्या हंगामात हॉटेल मालकाला हॉटेल बंद असल्यामुळे प्रचंड तोटा होतो आहे.

नेहमी सहकुटुंब विश्रांती साठी महाबळेश्वरला  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे येतात. 15 दिवसांपूर्वी असेच ते गेले असता त्यांना शेजारच्या हॉटेलमधील सुरू असलेल्या लग्नातील वरातीच्या आवाजाचा त्रास  झाला. त्या वरातीचा आवाज बंद करण्यास त्यांनी सांगितलं. मात्र ती वरात सुरूच राहिली.

विदर्भातील एका भाजप आमदाराच्या पुतण्याचा हा विवाह सोहळा  होता. सायंकाळी वरात निघाल्यानंतर या मंडळींनी डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली होती. तेव्हा अस्वस्थ झालेल्या ठाकरे कुटुंबीयाकडून हा आवाज बंद करण्याचं फर्मान निघालं.  लगेच मुंबईहून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आदेश गेले. या अधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला सूचना केली. मात्र, उत्साही वऱ्हाडी मंडळी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.  मुंबईतील 'सरकार'चा आदेश धुडकावून विदर्भातील वऱ्हाडी मंडळींची वरात मोठ्या थाटात सुरूच राहिली.

त्यानंतर पोलिस खात्यालाही आदेश गेले.  परंतु त्याचवेळी 'रात्री दहाच्या आत कशी काय कारवाई करणार?' असा सवाल खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विचारला गेल्यानं पोलिस अधिकारी गप्पच बसले. दोन मोठ्या खात्यांच्या शीतयुद्धात पोलिसांची गोची झाली. मात्र, दबाव प्रचंड वाढल्यानंतर या वऱ्हाडी मंडळींवर ध्वनीप्रदूषणाची कारवाई करण्यात आली.

काही दिवसांनी ठाकरे कुटुंबीय मुंबईत परतल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून सूत्रं हलली. विधानसभेच्या अधिवेशनात महाबळेश्वरमधील 'भल्यामोठ्या' ध्वनीप्रदूषणावर गंभीरपणे चर्चा करण्यात आली. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलवरच थेट कारवाई केली. जवळपास अलिशान ८४ खोल्या असलेल्या सर्वात मोठ्या हॉटेलला सील ठोकलं गेलं.

Loading...

महाबळेश्वर नगरपालिकेलाही रामदास कदम यांच्या कार्यालयातून फर्मान सुटलं. त्यानुसार नगरपालिकेनं या हॉटेलचं नळ कनेक्शन तोडलं. विद्युत पुरवठा तोडण्यासाठीही अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले. या सर्व प्रकारामुळं ख्रिसमस सुटीच्या ऐन हंगामात हे हॉटेल बंद झालं आणि अनेक उच्चभ्रू पर्यटकांना बाहेर पडावं लागलं.

एकेकाळी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष राहिलेल्या डी़ एम़ बावळेकर या शिवसेना नेत्यालाही हॉटेलमधील बांधकाम बेकायदा असल्याचा साक्षात्कार झाला. आता हे बांधकाम पाडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

या सगळ्या प्रकाराबाबत घाबरलेल्या हॉटेल व्यवस्थापन काहीही बोलायला तयार नाही मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या हॉटेल चे सर्व सूट सील केल्याची खात्रीलायक माहिती आहे.  त्यामुळे आता या सगळ्या प्रकाराची शिक्षा त्या हॉटेल मालकाला भोगावी लागणार आहे

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...