हिंगोली, 13 एप्रिल : माझ्या वडिलांना वाटणीचा हिस्सा का देत नाही ? म्हणत एका २१ वर्षीय नातवाने आजोबाच्या डोक्यात वीटनं वार करून हत्या केलीये. विठ्ठल धनवे असं मृत झालेल्या आजोबाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केलीये.
आखाडा बाळापुर शहरातील देवीगल्ली इथं विठ्ठल सखाराम धनवे हे आपल्या पत्नीसह स्वतःच्या घरात राहतात. तर त्यांचा मुलगा रामचंद्र धनवे हा त्याच्या कुटुंबासह हनुमान नगर इथं भाड्याच्या घरात राहतो. त्याला तीन मुले आहेत. रामचंद्र यांचा त्याच्या वडिलांशी ते राहत असलेल्या जागेवरून वाद होता. रामचंद्र हा त्यांना जागेत वाटणी मागत असे. यातच रामचंद्रचा मुलगा दत्ता धनवे हा त्याच्या आजोबाच्या घरी गेला. तेथे त्याने आजोबांना आम्हाला जागा का वाटून देत नाही असं विचारलं. यावरून त्यांच्यात जोराचं भांडण झालं. यातच संतापलेल्या दत्ताने तिथे पडलेल्या विटेनं आजोबाच्या डोक्यात तोंडावर वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या विठ्ठल धनवे यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर कौशल्याबाई धनवे यांच्या फिर्यादीवरून दत्ता च्याविरूद्ध आखाडा बाळापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दत्ताला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा