मराठवाडा आणि विदर्भावर रुसलेला पाऊस धो धो बरसला, पुणे-मुंबईतही मुसळधार

मराठवाडा आणि विदर्भावर रुसलेला पाऊस धो धो बरसला, पुणे-मुंबईतही मुसळधार

मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलीये. उस्मानाबादमध्ये 2 महिन्यांनतर पावसाने हजेरी लावलीये.

  • Share this:

20 आॅगस्ट : मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलीये. उस्मानाबादमध्ये 2 महिन्यांनतर पावसाने हजेरी लावलीये. तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यातही पावसाचं आगमन झालं. बारामतीच्या जिरायती पट्ट्यात पहाटेपासून संततधार सुरूच आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळालं असून तालुक्यामध्ये करण्यात आलेल्या ओढा खोलीकरण, सरळीकरण, यामध्ये पाणी साठण्यास सुरुवात झालीय. तर हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून पाऊस सुरू आहे.२४ तासात जिल्ह्यात ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अहमदनगरला जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात दमदार पाऊस पडलाय. जिल्ह्यात सरासरी चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. जामखेडला सर्वाधिक 87 मिमी पावसाची नोंद झाली. तर पारनेरला 82 मिमी आणि पाथर्डी, कर्जतला 63 मिमी पाऊस पडलाय.नांदेडमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात पाणी घुसलं आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत 43 टक्के पाऊस झाला आहे.

परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्वत्र मुसळधार पाऊस बरसलाय. काल दिवसभर सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र मध्यरात्रीपासून याचे स्वरूप मुसळधार पावसात झाले. जिल्ह्यात २४ तासात ४२.२१ मिमी एवढा पाऊस झालाय.तर ३४ मंडळ विभागातील पूर्णा, ताडकळस, चुडावा, लिमला या ४ मंडळात अतिवृष्टी झालीय. यामुळे सर्वच ठिकाणच्या ओढ्या, नाल्यांना खळखळून पाणी आले आहे . शेत शिवरातही पावसाचे पाणी साचले आहे.

पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील पद्मिण गायकवाड या ५८ वर्षीय महिलेचा भिंत कोसळून जागीच मृत्यू झाला. शिवाय परभणी शहरातील अनेक भागातील रस्त्यावरील नाल्या तुंबल्याने पाणी २ फुटांपर्यंत आले होते. सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे.

Loading...

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली.शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 24 तासात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात सरासरी 100 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय तर सर्वाधिक पाऊस 199 मिलीमीटर मुदखेड तालुक्यात झालाय.या जोरदार पावसामुळे अर्ध नांदेड शहर जलमय झालंय. शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या घरातही पाणी शिरलं आहे. नांदेड शहर बसस्थानकाला तलावाचं रुप आलं आहे. बस स्थानकात पाणी शिरल्यानं बसगाड्या बंद पडल्या आहेत. पाणी साचल्यामुळे प्रवासीही अडकून पडले आहेत. पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहताहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातही सर्वत्र पावसाला सुरूवात झालीय. या पावसामुळे शेतकरी सुखावलाय. तर अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस रुसला होता.त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू फुललंय.

नाशिकच्या सटाणा तालुक्यात मोठ्या प्रतिक्षेनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालंय. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी अजूनही सटाणा भागाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

बारामतीजवळच्या जिरायती पट्ट्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे बाजरी, भुईमूग, चवळी, सोयाबिन या पिकांना मोठा दिलासा मिळालाय. बारामतीजवळ झालेल्या जलशिवारच्या कामांमुळे ओढे आणि नाल्यांमध्ये पावसाचं पाणी साठायला सुरुवात झालीये. पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मिटणार आहे.

पुण्यातील पिंपरी - चिंचवडमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. काल रात्रीपासून जोरदार सुरू असलेल्या पावसामुळं मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.नाल्यांची सफाई पूर्णपणे न झाल्यामुळं नाल्याचे पाणीही रस्त्यावर आल्याचं पहायला मिळतंय. या जोरदार पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल  होताना दिसून येतंय.

आज पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरलाय. पावसाचा वाढलेला जोर आणि त्यात असलेला रविवार यामुळे मुंबईकरांनी घरात बसूनच पावसाचा आनंद घेणं पसंत केलं आहे. आजच्या दिवशी गणपतीच्या उत्सवाची खरेदी करण्यासाठी मुंबईमधील दादर परळमधील मार्केट फुललेली असतील असं वाटलं होतं पण पावसामुळे मुंबईकर घराबाहेर पडले नाहीत. येत्या २४ तासात पावसाचा जोर आणखीन वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मुसळधार पावसानं पवई तलाव भरलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...