ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निवडणुकीचा असा आहे कार्यक्रम

ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निवडणुकीचा असा आहे कार्यक्रम

नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत ७ आणि १४ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही समावेश आहे.

  • Share this:

01 सप्टेंबर : राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत ७ आणि १४ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात विविध १८ जिल्ह्यांतील ३ हजार ८८४, तर दुसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत राज्याभरातील सुमारे ८५००ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. संविधानातील तरतुदीनुसार मुदत संपण्यापूर्वी त्यांच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. यापैकी ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी२३ सप्टेंबर २०१७ रोजी मतदान होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या ६८९ आणि नव्याने स्थापित झालेल्या ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येईल अशी माहिती सहारिया यांनी दिली.

तीन ते चार मते देणे आवश्यक

थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका मतदाराला कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल; तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीदेखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही.

सरपंचपदासाठी फिकी निळी मतपत्रिका

पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा; तर नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असेल.

तर सातवी उत्तीर्ण आवश्यक

सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना सातवी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक राहील.

आचारसंहिता लागू

या सर्व ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यांत एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. त्याचप्रमाणे ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील; परंतु निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाही. त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाच्या दिवशी संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करतील.

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. ते २७ सप्टेंबर २०१७ पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ७ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. ९ ऑक्टोबर२०१७ रोजी मतमोजणी होईल.

दुसरा टप्पा

दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. ते ५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. १४ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी केवळ३.०० वाजेपर्यंत असेल. या सर्व ठिकाणी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतमोजणी होईल.

पहिल्या टप्यात ७ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी:

नाशिक- १७०,धुळे-१०८, जळगाव-१३८,नंदुरबार- ५१, अहमदनगर-२०४, औरंगाबाद- २१२, बीड-७०३, नांदेड- १७१, परभणी-१२६, उस्मानाबाद- १६५,जालना- २४०, लातूर- ३५३, हिंगोली- ४९, अमरावती- २६२, अकोला- २७२, यवतमाळ- ९३,वाशीम- २८७ आणि बुलडाणा-२८०. एकूण- ३८८४

दुसऱ्या टप्यात १४ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी:

ठाणे- ४१,पालघर- ५६, रायगड- २४२,रत्नागिरी- २२२, सिंधुदुर्ग-३२५, पुणे- २२१, सोलापूर-१९२, सातारा- ३१९, सांगली-४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर-२३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२,भंडारा- ३६२, गोंदिया- ३५३आणि गडचिरोली- २६. एकूण-३६९२

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 10:50 PM IST

ताज्या बातम्या