Elec-widget

गोकुळ दुधावरून तापलं कोल्हापुरातलं राजकारण!

गोकुळ दुधावरून तापलं कोल्हापुरातलं राजकारण!

एकवेळ आमदारकी नको पण गोकुळचे संचालक पद द्या अशी इथल्या नेत्यांची मागणी असते. पण...

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

कोल्हापूर, 14 सप्टेंबर : दक्षिण महाराष्ट्रातला एक सधन जिल्हा. सहकाराची पंढरी अशीही कोल्हापूरची ओळख. याच कोल्हापूरची अर्थवाहिनी म्हणून गोकुळ दूध संघाला ओळखलं जातं. एकवेळ आमदारकी नको पण गोकुळचे संचालक पद द्या अशी इथल्या नेत्यांची मागणी असते. दररोज लाखो लीटर दूध ग्रामीण भागांमधून संकलित केलं जातं आणि तेच दूध पुण्या-मुंबईला पुरवले जातं. या गोकुळ दूध संघावर गेल्या अनेक वर्षांपासून विधानपरिषदेचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता आहे आणि त्यांना विरोध करणारे नेते म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील.

सध्या गोकुळ दूध संघ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. मात्र संचालक मंडळ आणि सत्ताधारी नेत्यांनी हा दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र याला ग्रामीण भागातील दूध उत्पादक संस्था आणि विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांमध्ये याला जोरदार विरोध होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. त्यातच येत्या 21 सप्टेंबरला गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात होणाऱ्या गोकुळच्या सभांमध्ये मल्टीस्टेटचा मुद्दा चांगलाच गाजतोय.

यावरूनच दोन दिवसांपूर्वी एका सभेत सतेज पाटील समर्थक विश्वास नेजदार यांना मारहाण झाली.  त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. नेजदार समर्थकांनी महाडिक यांना कसबा बावड्यात येण्याचं आव्हान दिलं होतं आणि महाडिक यांनी ते स्वीकारलं. महाडिक बावड्यात आले मात्र त्यांनी नेजदार कुटुंबीयांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

यानंतर महाडिक थेट गेले सतेज पाटील यांच्या घरी. त्यांनी गेटवरूनच आमदार बंटी पाटील आहेत का अशी विचारणा केली मात्र आमदार पाटील पुण्याला असल्याचं समजताच त्यांनी पुन्हा गाडी आहे तशी माघारी घेतली. आज म्हणजेच शुक्रवारी सकाळी घडलेल्या प्रकाराची जोरदार चर्चा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतेय.

Loading...

दुसरीकडे येत्या 21 सप्टेंबरला होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेवरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या सभेच ठिकाण बदलावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे तर सत्ताधारी ताराबाई पार्कातील गोकुळ दूध संघाच्या कार्यालय परिसरातच सभा होईल यावर ठाम आहेत. मात्र याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सध्या गणेशोत्सव आहे त्याचा बंदोबस्त असतानाच गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेचं टेन्शनही पोलीस प्रशासनासमोर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची किनारही या गोकुळच्या संघर्षामध्ये असून महाडिक आणि पाटील हे पारंपरिक गट पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये आमनेसामने आले आहेत. म्हणूनच येत्या 21 तारखेच्या सभेत नेमकं काय होणार याची उत्सुकता दूध उत्पादकांसह राजकीय वर्तुळाला लागलेली आहे.

 

२ दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज सोडणारा तरुण कसा झाला 3000 कोटींच्या कंपनीचा मालक?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...