पुण्यातील कचराकोंडीचा प्रश्न वाऱ्यावर, लोकप्रतिनिधी परदेश दौऱ्यावर

पुण्यातील कचराकोंडीचा प्रश्न वाऱ्यावर, लोकप्रतिनिधी परदेश दौऱ्यावर

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार कचऱ्याचा प्रश्न वाऱ्यावर सोडून परदेश दौऱ्यावर गेले आहेत.

  • Share this:

02 मे :  गेल्या 17 दिवसांपासून पुण्यातील फुरसुंगीमध्ये कचरा तसाच पडून आहे. जागोजागी कचऱ्याचा ढीग साचून आहे. या साठलेल्या कचऱ्यामुळं पुणेकरांच्या आरोग्याला धोकाही निर्माण झाला आहे. पंधरा दिवस उलटून गेले तरी कचराडेपो संदर्भात उच्चस्तरीय बैठक झालेली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्र्यांवर जबाबदारी टाकली आहे. मात्र, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार कचऱ्याचा प्रश्न वाऱ्यावर सोडून परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे पुण्यातील कचराकोंडीचा प्रश्न वाऱ्यावर लोकप्रतिनिधी परदेश दौऱ्यावर, अशी अवस्था झालीय.

पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. मात्र, कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा न काढताच  पालकमंत्री आणि महापौरांनी ऑस्ट्रेलिया आणि मॅक्सिकोला जाणं पसंत केलं.

कचऱ्याच्या प्रश्नावर ना फुरसुंगीवासीय मागे हटत आहेत, ना प्रशासन यावर कोणतं पाऊल उचलत आहे. या दोघांच्या संघर्षात सामान्य पुणेकराला मात्र कचऱ्यात राहावं लागत आहे.

दरम्यान, महापौर मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणासाठी आयोजित परिषदेसाठी आजपासून आठ दिवस मॅक्सिकोला जाणार आहेत. तर पालकमंत्री गिरीष बापट हे 2 मे ते 11 मेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे आणखी 8 ते 10 दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. पुणेकर मात्र, कचऱ्याचा प्रश्न नेमका कसा निकाली निघणार याकडे डोळे लागून राहिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 12:12 PM IST

ताज्या बातम्या