भुसावळात दगडी कोळशाच्या वॅगनला आग; पोस्ट ऑफिसातील जनरेटर पेटला

भुसावळ रेल्वे यार्ड परिसरात असलेल्या दगडी कोळशाच्या वॅगनला आग लागली, तर दुसरीकडे भुसावळ येथील मुख्य पोस्ट ऑफिसमधील जनरेटरने अचानक पेट घेतला.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 04:05 PM IST

भुसावळात दगडी कोळशाच्या वॅगनला आग; पोस्ट ऑफिसातील जनरेटर पेटला

इम्तियाज अहमद(प्रतिनिधी)

भुसावळ, 29 एप्रिल- जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वर चढला आहे. भुसावळात अतितापमानामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भुसावळ रेल्वे यार्ड परिसरात असलेल्या दगडी कोळशाच्या वॅगनला आग लागली, तर दुसरीकडे भुसावळ येथील मुख्य पोस्ट ऑफिसमधील जनरेटरने अचानक पेट घेतला.

रेल्वे यार्डमधे उभ्या असलेल्या दगडी कोळशाच्या वॅगनला अचानक आग लागली. वॅगनमधून धूर येताच जवळ असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीने उग्ररूप धारण करण्यापूर्वी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मॉर्डन रोड परिसरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील जनरेटरला आग लागली. नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.

भुसावळच्या तापमानाचा पारा 47.6 अंशांवर..

हॉट सिटी भुसावळने आता राज्यातील उच्चांकी तापमान असलेल्या अकोल्याचा रेकॉर्ड आता भुसावळने तोडला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी अर्थात 47.6 अंशावर पोहोचले. शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात ही नोंद करण्यात आली.

Loading...

उत्तर भारताला जोडणाऱ्या मध्य रेल्वेचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराची आता हॉट सिटी म्हणून ओळख निर्माण केली आहे. दरम्यान भुसावळातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने शहराच्या तापमानाचा पारा 47.6 अंश असल्याची नोंद केली आहे. उच्चांकी तापमानामुळे आता शहरातील जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.

दीपनगर औष्णिक केंद्रामुळे होणारे थर्मल पोल्यूशन, अविकसीत ग्रीन बेल्ट आदींमुळे शहरातील तापमानाचा पारा दिवसागणीक वाढत आहे. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत भुसावळ शहराचे तापमान सरासरी दोन अंशांनी अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात यापूर्वी १ मे २००९ रोजी 47.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. या तापमानाचा रेकॉर्ड देखील आता तूटला आहे. उच्चांकी तापमानामुळे शहरात दुपारी 12 ते पाच वाजेपर्यंत रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती निर्माण होत असून रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. शहरात अजून दोन ते तीन दिवस उच्चांकी तापमान राहू शकेल, असा अंदाजही केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयातील सूत्रांनी वर्तवला आहे.


पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...