कोल्हापुरात म्हशींचा फॅशन शो

कोल्हापुरात म्हशींचा फॅशन शो

  • Share this:

कोल्हापूर, 20 ऑक्टोबर: जगात भारी कोल्हापूर असं म्हणतात ते उगाच नाही. कोल्हापुरात आज आगळावेगळा फॅशन शो पार पडला. हा फॅशन शो होता म्हशींचा. कोल्हापुरातल्या कसबा बावड्यात म्हशींचा फॅशन शो पार पडला. या शोमध्ये सहभागी झालेल्या म्हशींना मालकांनी खास असं सजवलं होतं.

या म्हशींचा रॅम्प वॉक पार पडला रस्त्यावर. पण हा रॅम्प वॉक पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. या फॅशन शोमध्ये सहभागी म्हशींसाठी खास स्पर्धा पण भरवल्या होत्या.

कुणाच्या शिंगांना मनमोहक मोरपिसं लावली होती तर कुणाच्या अंगावर गुलाल होता. कुणाची पूजा होत होती तर कुणाला कुरवाळलं जातं होतं. तर कुणाला गोड नैवेद्य दाखवला जात होता. कसबा बावड्यातल्या फॅशन शोला जाण्यासाठी म्हशी अशा सजल्या होत्या. वर्षभर दुभती जनावरं शेतकऱ्याला आणि मालकाला फायदा करुन देतात. त्याबद्दलच कृतज्ञता व्यक्त करणं पण त्याप्रतीचं एक सहानुभुती आणि कर्तव्य म्हणून कोल्हापूरमध्ये हा म्हशींचा फॅशन शो आयोजित केला जातो. जगात भारी कोल्हापूरात या म्हैशी आपापल्या कला सादर करतात. त्यामध्ये सायलेन्सर काढलेल्या गाडीच्या मागून धावणे, वेगवेगळ्या कसरती करणे, मालकाच्या मागून धावणे अशा कला या सगळ्या म्हशी सादर करतात.

कोल्हापुरातल्या याच बावड्यात वेताळबाचा देव आहे. या देवालाही या सगळ्या म्हशींना नेलं जातं. तिथंही या जनावरांची पुजा केली जाते. त्यानंतर गावातून वाजतगाजत त्यांची मिरवणूकही काढली जाते. पण झणझणीत मिसळ, कडक तांबडा पाढरा रस्सा आणि कुस्तीसाठी नादखुळा असलेल्या कोल्हापूरात आजही अनेक परंपरा जपल्या जातात. हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 06:39 PM IST

ताज्या बातम्या