नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

कधी बारदाणा संपल्याचं कारण देत तर कधी साठवणुकीचं कारण देत नाफेडकडून तुर शेतक-यांची तूर खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2017 06:32 PM IST

नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

प्रफुल्ल खंदारे,13 एप्रिल : राज्यात सध्या सर्वत्र तुरीला भाव नसल्यानं शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. कधी बारदाणा संपल्याचं कारण देत तर कधी साठवणुकीचं कारण देत नाफेडकडून तुर शेतक-यांची तुर खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर याच्या बुलढाणा जिल्ह्यातील नादुरा तालुक्यात फूड कार्पोरेशन आॅफ इंडिया अर्थात नाफेडच्या मार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून या बाजार समितीत मोठया प्रमाणात गौडबंगाल होत असून २ महिन्यापासून शेतकऱ्याची तूर खरेदी बंद करण्यात आली आहे.

याच बाजार समितीत हजारो शेतकऱ्यांची तूर पडून असून याची खरेदी झाली नसल्याने शेतकरी मोठया अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे मात्र नाफेडकडून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा माल खरेदी होत असल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस येत आहे. एकीकडे शेतकऱ्याच्या मालाची चार वेळा चाळणी केली जाते, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची निकृष्ट दर्जाची तूर खरेदी केली जात असल्याचंही विदारक सत्यही यानिमित्ताने समोर येत आहे.

मागील वर्षी सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव गगनाला भिडले होते. किरकोळ बाजारात तुरीने 200 रुपये किलो इतका उच्चांकी भाव गाठला होता. तुरीचा वाढलेला भाव लक्षात घेता यावर्षी शेतकऱ्यांनी तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्याचबरोबर तुरीचं भरघोस उत्पादन देखील झालं. मात्र तुरीला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कधी बारदाण्याचं तर कधी साठवणुकीचं कारण देत शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे.

दरम्यान काही शेतकऱ्यांनी याच नांदुरा येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांचा निकृष्ट माल चोरट्या मार्गाने खरेदी होत असताना पकडला. त्यामुळे पुन्हा एकदा नाफेडचं तूर केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. काल रात्री बाजार समितीतील आवारात शेतकऱ्यांनी ११४ कट्टे तूर पकडली. ही तूर फूड कार्पोरेशन आॅफ इंडियाच्या पोत्यात आढळून अाली मात्र याबाबत एकही प्रशासकीय अधिकारी वा कर्मचारी यांना माहिती नाही.

दरम्यान यासंदर्भात संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारल्यानंतर याबाबत बाजार समितीने नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची या नाफेड तूर खरेदी केंद्रावर कुचंबणा होत असून राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याच बुलडाणा जिल्ह्यातील हा संपूर्ण प्रकार घडत असल्याने, इतर शेतकऱ्यांनी पहावे तरी कुणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...