मुंबई 26 जानेवारी : महाराष्ट्रात भाजप विरोधात 'आघाडी' तयार झाली. या आघाडीत दिर्घकाळ भाजपचा मित्रपक्ष असलेली राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी आहे. मोदींना सत्तेतून खाली खेचण्याच्या गर्जना करणाऱ्या या आघाडीतच आता बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीय. विदर्भातल्या दोन जागा सोडायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार नाही.
त्यामुळे 'स्वाभिमान' दुखावल्याने आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा कोल्हापूर भागात प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हातकणंगल्याची जागा सोडायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार आहे. मात्र राजू शेट्टी यांना विदर्भातल्या बुलडाणा आणि वर्धा या दोन जागाही हव्या आहेत.
मात्र या जागा सोडायला आघाडीचे नेते तयार नाहीत. त्यामुळे राजू शेट्टी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अल्टीमेटम दिला आहे. आघाडीच्या नेत्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यात चौथी आघाडी उभी करू असा इशारा शेट्टी यांनी दिलाय.
कोल्हापूर आणि सांगलीचा भाग सोडला तर स्वाभिमानीची ताकद फारशी नाही. त्यातच सदाभाऊ खोत हे स्वाभिमानीतून बाहेर पडले. त्यांची सध्या भाजपशी मैत्री आहे. त्यामुळे शेट्टींची ताकद घटली आहे. त्यामुळे मर्यादीत ताकद असताना शेट्टी यांनी आणखी जागा मागणं योग्य नाही असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटतं.
तर आघाडीला मित्रपक्षांची गरज असल्याने दबाव टाकून आणखी काही पदरात पाडून घ्यावं अशी शेट्टी यांची रणनीती असू शकते. या आधी बोलताना राजू शेट्टी यांनी जास्त ताणून धरणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते आता नेमकी कुठली भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO: बायकोला प्रियकरासोबत रंगे हात पकडलं, पतीने भर रस्त्यात घातला राडा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा