अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका, राज्यांवर त्याचा असा परिणाम होणार

या वादळाचा परिणाम म्हणजे कोकण आणि मुंबईत पाऊस येण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 05:00 PM IST

अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका, राज्यांवर त्याचा असा परिणाम होणार

मुंबई 9 जून : देशाच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 आणि 12 जून दरम्यान हे चक्रीवादळ येणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर हे वादळ राहणार आहे त्यामुळे राज्याला धोका नाही असा निर्वाळाही हवामान विभागाने दिला आहे.

हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या काळात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षितेसाठी मासेमारांनी 11 आणि 12 जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे असं आवाहन करण्यात आलंय.

मान्सूनचं आगमन

सर्वांसाठी खुशखबर! कारण, आतुरतेनं वाट पाहत असलेला मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागानं याची घोषणा केली आहे. हळूहळू हा मान्सून पुढे सरकेल अशी माहिती देखील यावेळी हवामान विभागानं दिली आहे. 10 जूनला मान्सून दाखल होईल असा अंदाज होता. पण, दोन दिवस अगोदरच मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. पाणी टंचाईचा सामना देखील करावा लागत आहे. पण, आता केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानं आता दिलासा मिळाला आहे. पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज यावेळी हवामान तज्ञ्ज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, कोकणात देखील मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून दाखल होईल अशी माहिती साबळे यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिली. सकाळी वर्धा, मनमाड, कोल्हापुरात वादळीवाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसानं घरावरचं छप्पर देखील उडालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...