04 एप्रिल : लोणावळ्यात आयएनएस शिवाजी परिसरात संशयास्पदरित्या आढळलेल्या तरूण आणि तरूणीचा मृतदेहाची ओळख पटलीये. ही हत्या आहे की आत्महत्या पोलीस याचा शोध घेत आहे.
दुपारी पाचच्या सुमारास नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राजवळ २ मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस तपासादरम्यान या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून हे दोघेहीजण सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत, असं कळलंय. तरूणाचे नाव सार्थक वाकचौरे असून तो बीए मॅकेनिकलच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता.
सार्थक हा मुळचा अहमदनगरच्या राहुरी येथील आहे. तर मृत तरूणीचे नाव श्रुती डुंबरे असून ती जुन्नरच्या ओतूर या गावात राहणारी आहे. हे दोघेही सिंहगड महाविद्यालयात शिकत होते. श्रुती हॉस्टेलवर राहत होती. तर सार्थक हा हॉस्टेलजवळच्या परिसरात भाड्याने घर घेऊन राहत होता.
दरम्यान, प्रथमदर्शनी या दोघांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दोघांची हत्या करण्यात आली किंवा या दोघांनी आत्महत्या केली, याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा