News18 Lokmat

गगनबावड्यात हत्तीच्या हल्ल्यात 5 नागरिक जखमी

इथल्या नागरिकांनी लवकर गावात पोहोचण्यासाठी जंगली पायवाटेनं चालणं सुरू केलं आणि संध्याकाळी 6 च्या सुमारास जंगलातल्या टस्कर हत्तीनं या 5 नागरिकांवर हल्ला केला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2017 02:29 PM IST

गगनबावड्यात हत्तीच्या हल्ल्यात 5 नागरिक जखमी

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 16 आॅगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात 5 नागरिक जखमी झालेत. गगनबावडा तालुक्यात ही घटना घडली असून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुका हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत येतो.याच तालुक्याला लागून कोकणातल्या सिंधुदूर्ग जिल्ह्याचीही हद्द आहे. या तालुक्यातील सैतवडे गावाजवळ बुवाची वाडी आहे. या वाडीतले लोक काल (मंगळवारी) संध्याकाळी ग्रामदैवत वेताळ माळमहाराजांच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर येताना इथल्या नागरिकांनी लवकर गावात पोहोचण्यासाठी जंगली पायवाटेनं चालणं सुरू केलं आणि संध्याकाळी 6 च्या सुमारास जंगलातल्या टस्कर हत्तीनं या 5 नागरिकांवर हल्ला केला.

हत्तीच्या या हल्ल्यामध्ये महादेव हाळे हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्या पायाला आणि पाठिला गंभीर इजा झालीय. तर उर्वरित 4 जणांना हत्तीनं भिरकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी वेळीच पळ काढला. यामध्ये ते चौघेही किरकोळ जखमी झालेत. या सर्वांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून हाळे यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना कोल्हापूरमधल्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यातच मुबलक पाणी आणि ऊस, भात केळी यांसारखं खाद्य उपलब्ध असल्यानं या भागात हत्तींचा वावर आहे आणि हेच हत्ती मानवी वस्ती आणि गावांकडच्या भागातही येत आहेत. तरीही वनविभाग याकडं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. गगनबावड्याप्रमाणे चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यातही हत्तींचा त्रास कायमचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...