लाव रे तो व्हिडिओ..मुंबईतही घुमणार राज ठाकरे यांचा आवाज, सभेला अखेर मिळाली परवानगी

लाव रे तो व्हिडिओ..मुंबईतही घुमणार राज ठाकरे यांचा आवाज, सभेला अखेर मिळाली परवानगी

मुंबईतील काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावर राज ठाकरे यांची सभा 24 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली होती. आता मात्र ही सभा 24 ऐवजी 23 तारखेला होणार आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार

मुंबई, 21 एप्रिल - लोकसभा निवडणूक मनसे लढवत नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोडारडेपणा उघड करणार, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदीसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे राज्यभर सभा घेत असून त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला. 'लाव रे तो व्हिडीओ' हा आदेश आता मुंबईतही ऐकायला मिळणार आहे.  राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला राज्य निवडणूक आयोगाने अखेर परवानगी दिली आहे. आधी सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राज यांच्या मुंबईतील सभेची उत्सुकता आणखी वाढली आहे.

24 ऐवजी 23 ला सभा

मुंबईतील काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावर राज ठाकरे यांची सभा 24 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली होती. आता मात्र ही सभा 24 ऐवजी 23 तारखेला  होणार आहे. राज यांच्या याच सभेला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली होती.  मुंबईतील या सभेवरून पालिका प्रशासान आणि निवडणूक अधिकारी यांच्याकडून देखील टाळाटाळ केली होती. पण, निवडणूक आयोगाने परवानगी दिली नाही तरी आम्ही सभा घेणार, अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली होती.

काय म्हणालं निवडणूक आयोग?

24  एप्रिल रोजी मुंबईतील शिवडी येथे होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला अजून परवानगी मिळालेली नाही. मनसेचा उमेदवार उभा नसल्याने परवानगी देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तर, दुसरीकडे महानगर पालिकाही परवानगी नाकारत आहे. शिवडीच्या नरे पार्क आणि भगतसिंग मैदानावर सभेसाठी मनसेने परवानगी मागितली होती. यावेळी सारख्याच मैदानाकरिता अरविंद सावंत यांनी या मैदानाची मागणी केली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मात्र परवानगी दिली नसली तरी देखील आम्ही सभा घेणार अशी भूमिका मनसेनं घेतली आहे.

राज यांचा घणाघात

मनसेने लोकसभा निवडणूक लढवत नाही. मात्र, राज ठाकरे राज्यभर सभा घेत भाजपवर टीकास्त्र डागत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज यांच्या निशाण्यावर आहेत. जुने व्हिडीओ दाखवत, काही महिती दाखवत राज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे भाजपला राज्यात तरी त्याचे परिणाम भोगावे लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राज यांच्या सभांचा झंझावत पाहता भाजप देखील हतबल झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. शिवाय, त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण, निवडणूक आयोगाने परवानगी नाकारल्यानंतर देखील मनसेने मुंबईतील सभा होणार, अशी भूमिका घेतली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या