पालघरमध्ये भूकंपाचा पहिला बळी, बालिकेचा दगडावर आदळून मृत्यू

तलासरी ग्रामीण रुग्णालयामध्ये मुलीला उपचारासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2019 09:02 PM IST

पालघरमध्ये भूकंपाचा पहिला बळी, बालिकेचा दगडावर आदळून मृत्यू

विजय राऊत, प्रतिनिधी

पालघर, 01 फेब्रुवारी : डहाणू आणि तलासरी तालुक्यात सातत्याने घडणाऱ्या भूकंपाच्या मालिकेत आज एका 2 वर्षाच्या बालिकेला बळी गेला आहे. भूकंपाच्या धक्क्याने भयभीत होऊन धावत असताना दगडावर आदळून या चिमुरडीचा दुर्दैवी मृ्त्यू झाला.

शुक्रवारी दुपारच्या दोन वाजेच्या सुमारास हलद पाडा इथं राहणारी वैभवी रमेश भूयाळ ही मुलगी भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातून बाहेर पडताना दगडावर आदळली. दगडावर डोके आदळून मार लागला होता. या जखमेत नाकातोंडात रक्त येताच आईने तसंच आजूबाजूच्या लोकांनी तलासरी ग्रामीण रुग्णालयामध्ये मुलीला उपचारासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला.

तलासरी ग्रामीण रुग्णालयात चिमुकलीचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. ही माहिती मिळताच पालघर जिल्हाधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तलासरी अणि डहाणू तालुक्यात सकाळपासून भूकंपाचे 4 धक्के बसले असून त्यातील दुपारी 2.06 वाजता बसलेला धक्का आजपर्यंतचा सर्वात मोठा 4.1 रिश्टर स्केलचा आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू 5 किलोमीटर खोलीवर आहे.

Loading...

पहिला धक्का सकाळी 6.58 वाजता, 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा बसला होता. दुसरा धक्का सकाळी 10.03 वाजता, 3.5 रिश्टर स्केलचा (तुलनेने अधिक) होता. तिसरा धक्का लगेचच सकाळी 10.29 वाजता 3.0 रिश्टर स्केलचा बसला आणि त्यानंतर दुपारी 2.06 वाजता 4 था धक्का बसला. या सर्व भूकंपांचा केंद्रबिंदू अक्षांश 20.0 N आणि रेखांश 72.9 E असाच होता. या आधीच्या भूकंपाचे केंद्रबिंदू इथंच होते. 

यातील पहिला भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला तर दुसरा, तिसरा आणि चौथा भूकंप 5 किलोमीटर खोलीवर होता.

भूकंपाचा घटनाक्रम :

- 11 नोव्हेंबर 3.2 रिस्टर स्केल

- 24 नोव्हेंबर 3.3 रिस्टर स्केल

- 1 डिसेंबर 3.1 आणि 2.9 रिस्टर स्केलचे लागोपाठ दोन धक्के

- 4 डिसेंबर 3.2 रिस्टर स्केल

- 7 डिसेंबर 2.9 रिस्टर स्केल

- 10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 स्केल

- 20 जानेवारी रोजी 3.6 रिस्टर स्केल

- 24 जानेवारी रोजी 3.4 रिस्टर स्केल

याशिवाय अधून मधून सौम्य धक्के जाणवले. गेल्या तीन महिन्यात सौम्य आणि जोरदार भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद करण्यात आली आहे.

===========बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...