S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भीमराव गस्ती यांचं निधन

गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड समाजाच्या मुक्ती आणि सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे त्यांनी काम केलं.तर देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी गस्ती आयुष्यभर झटले.

Sonali Deshpande | Updated On: Aug 8, 2017 01:29 PM IST

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भीमराव गस्ती यांचं निधन

संदीप राजगोळकर, 08 आॅगस्ट : ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भीमराव गस्ती यांचं निधन झालं. गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड समाजाच्या मुक्ती आणि सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे त्यांनी काम केलं.तर देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी गस्ती आयुष्यभर झटले.

मंगळवारी डॉ. गस्ती यांना अस्वस्थ वाटल्यानं त्यांना बेळगावच्या केएलई सोसायटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं..मात्र नंतर त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. त्यासाठी ते गुरुवारी सायंकाळी बेळगावहून पुण्याकडे जाण्यास निघाले.मात्र काही किलोमीटर अंतरावरच अस्वस्थ वाटू लागल्यानं एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. याच खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यांच्यावर न्यूमोनियाचे उपचार सुरू होते.गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारलेला समाज अशी बेरड समाजाची ओळख. आज याच समाजाची ओळख बदललीय. अनेक जण या समाजात आज मानानं जगताहेत. पण ज्या काळात या समाजाला हालअपेष्ठा सहन कराव्या लागत होत्या, त्याच काळात बेळगाव आणि कोल्हापूर भागातून एक समाजसेवक लढाईला उतरला. डॉ. भीमराव गस्ती हे त्यांचं नावं.

देवदासी प्रथेविरुध्द सामाजिक प्रबोधन करणारे डॉ. गस्ती हे मूळचे बेळगावजवळच्या यमनापूरचे. अंधश्रध्दा आणि रुढी- परंपरांनी जखडलेल्या बेरड समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. पुढं एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेटही संपादन केली. नंतर हैद्राबादच्या डी. आर. डी. ओ. मध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरीही मिळाली होती.

सुट्टीत गावी परतल्यावर बेळगावजवळच्या सुतकट्टी घाटात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात, त्या परिसरातल्या बेरड समाजातल्या वीस निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा अनन्वित छळ होत होता..आणि याच अन्यायानं पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली.  मोर्चे काढले, आंदोलने केली. आणि या घटनेने त्यांचं जीवनच बदलललं. त्यांनी स्वतःला बेरड समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतलं होतं. निपाणीत त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह सुरु केलं. देवदासीच्या प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरु केली. शेकडो देवदासींचे विवाहही केले. त्यांच्या २५ / ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळं देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झाल्या आहेत.

डॉ. गस्ती यांनी सामाजिक कार्याबरोबरच विपुल लेखनही केलं आहे. सध्या ते साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. सामाजिक समरसता मंच प्रणित समरसता साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. त्याचबरोबर आक्रोश, सांजवारा ही त्यांची पुस्तकं प्रसिध्द ठरली .याच आपल्या कार्यातून बेरड समाजाला दिशा देणाऱ्या डॉ. भीमराव गस्ती यांना आयबीएन लोकमतचाही सलाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close