मुंबई, २१ सप्टेंबर- हायकोर्टाने यंदा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बी वाजवण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. यासंदर्भातील पुढची सुनावणी चार दिवसांनी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यभरात होणाऱ्या ध्वनीप्रदुषणचे संदर्भ देत डॉल्बी आणि डीजे सिस्टमवर बंदी घातली आहे. प्रोफेशनल ऑडिओ आणि लायटिंग असोसिएशनने मुंबई हायकोर्टात बंदी हटवण्याची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची मागणी नाकारत सरकारच्या बाजूने निर्णय दिला.
दरम्यान, ध्वनी प्रदुषण निर्माण करणा-या साधनांना परवानगी नाहीच अशी ठाम भूमिका राज्य सरकारने कोर्टासमोर मांडली. डीजे सिस्टिम सुरू करताच ध्वनी मर्यादेची पातळी ओलांडतात, त्यामुळे परवानगीचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत विसर्जनासाठी डीजे वाजवण्याची परवाणगी मिळणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं.
विसर्जन मिरवणुकीसारख्या सोहळ्यानंतर पोलीस केवळ कारवाई करू शकतात, त्यांना रोखू शकत नाहीत. पण गेल्या वर्षीच्या ध्वनी प्रदुषणाच्या ७५ टक्के केसेस डीजेमुळे असल्याचं राज्य सराकरनं कोर्टात उघड केलं आहे. तर याचिकाकर्त्यांनी त्यांच्या डीजेमुळे ध्वनीप्रदुषण होणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं पण मुळात डीजेचा आवाज कायद्याच्या मर्यादेत राहणारा नाहीये असं मत राज्य सरकारनं कोर्टात मांडलं आहे.
आम्हाला जे ध्वनी प्रदूषणासाठी खरेच जबाबदार आहे त्यावर घाला घालायचा आहे, एखाद्या डीजे आॅपरेटरसारख्या प्याद्याला अटक करुन उपयोग नसल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदुषण होऊ नये म्हणून डीजे वाजवण्यावर राज्य सरकारने कोर्टात विरोध केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा