धुळ्यात बंडखोरीची लागण सर्वच पक्षांना, निवडणुकीच्या रिंगणात 356 उमेदवार!

धुळ्यात बंडखोरीची लागण सर्वच पक्षांना, निवडणुकीच्या रिंगणात 356 उमेदवार!

धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक होतेय. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रिंगणात 356 उमेदवार राहिले आहेत.

  • Share this:

दीपक बोरसे, धुळे, 26 नोव्हेंबर : धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक आखाड्याचं चित्र स्पष्ट झालंय. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रिंगणात 356 उमेदवार राहिले आहेत. सोमवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी 111 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक होतेय. बंडखोरीची लागण सर्वच पक्षांना झाली असून ज्यांना तिकिट मिळालं नाही अशा अनेक नाराजांनी दंड थोपटले आहेत.

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात 356 उमेदवार उरले असून शहरातील तीन लाख 29 हजार मतदार हे येत्या 9 डिसेंबर रोजी मतपेटीत उमेदवारांचं भवितव्य ठरविणार आहेत. अर्ज छाननी नंतरच्या निर्णयांविरूद्ध 29 इच्छुक उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितली होती, मात्र न्यायालयानं 28 जणांची याचिका फेटाळून लावत फक्त एका जागेवरती याचिकेवर निर्णय दिलाय.

यात प्रभाग क्रमांक 19 मध्ये समाजवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवार यांचा फक्त एक अर्ज शिल्लक राहिला होता, उर्वरित तीन उमेदवार हे अपात्र ठरले होते. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार या बिनविरोध निवडून आल्याचे समोर आलं होतं. मात्र न्यायालयाने या प्रभागात कोणीही बिनविरोध झाले नसून अन्य प्रभागात सोबत येथेही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

अनिल गोटे फॅक्टर किती महत्वाचा?

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटेंच्या प्रवेशामुळं चौरंगी लढत होणार आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि गोटेंचा लोकसंग्राम यांच्यात खरा सामना रंगणार आहे. धुळ्यात गोटेंचा जनसंपर्क दांडगा आहे आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्कही आहे. त्यामुळं त्याचा फटका भाजपला बसू शकतो.

महपालिका निवडणुकीत जय-पराजयाची अंतर हे अतिशय कमी असतं. भाजपमधल्या अनेक असंतुष्टांना गोटेंनी हाताशी धरलंय. त्यामुळं जिंकण्याची ताकद नसली तरी पराभव करण्याएवढं उपद्रमुल्य त्यांच्यात नक्कीच आहे. त्यामुळं भाजपची चिंता वाढली आहे.

मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे या निवडणुकीत खास लक्ष घालत आहेत. त्यामुळं भाजपचं पारडं जड आहे.

धुळे महापालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. 19 प्रभागांमध्ये 74 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार असून 10 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 10:55 PM IST

ताज्या बातम्या