अखेर अनिल गोटेंना 'शिट्टी' मिळालीच नाही!

अखेर अनिल गोटेंना 'शिट्टी' मिळालीच नाही!

  • Share this:

दीपक बोरसे, धुळे, 30 नोव्हेंबर : महापालिका निवडणुकींमध्ये पक्षांच्या निवडणूक चिन्हांना खास महत्व असतं. त्यात जर ते पक्ष छोटे असतील तर चांगलं चिन्ह मिळावं अशी त्यांची धडपड असते. धुळ्यात अनिल गोटे यांनी भाजपपासून फारकत घेऊन नवीन गट स्थापन केला. 'लोकसंग्राम' असं त्या गटाचं नाव आहे. 'लोकसंग्राम'ने धुळ्यास सर्व जागांसाठी उमेदवार उभे केले. या सर्वांसाठी 'शिट्टी' हे निवडणुक चिन्ह मिळावं अशी त्यांची मागणी होती. मात्र ही मागणी निवडणुक आयोगानं फेटाळली आहे. गोटे त्या विरोधात हायकोर्टात गेले तिथेही त्यांची मागणी फेटाळण्यात आली.


समान चिन्ह न मिळाल्याने लोकसंग्रामच्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर करायलाही उशीर लागला होता. आता त्यांच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्ह मिळणार असल्याने लोकसंग्रामचा प्रचार कसा होतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे.


धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात 356 उमेदवार उरले असून शहरातील तीन लाख 29 हजार मतदार हे येत्या 9 डिसेंबर रोजी मतपेटीत उमेदवारांचं भवितव्य ठरविणार आहेत. अर्ज छाननी नंतरच्या निर्णयांविरूद्ध 29 इच्छुक उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितली होती, मात्र न्यायालयानं 28 जणांची याचिका फेटाळून लावत फक्त एका जागेवरती याचिकेवर निर्णय दिलाय.


यात प्रभाग क्रमांक 19 मध्ये समाजवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवार यांचा फक्त एक अर्ज शिल्लक राहिला होता, उर्वरित तीन उमेदवार हे अपात्र ठरले होते. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार या बिनविरोध निवडून आल्याचे समोर आलं होतं. मात्र न्यायालयाने या प्रभागात कोणीही बिनविरोध झाले नसून अन्य प्रभागात सोबत येथेही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.


अनिल गोटे फॅक्टर किती महत्वाचा?


भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटेंच्या प्रवेशामुळं चौरंगी लढत होणार आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि गोटेंचा लोकसंग्राम यांच्यात खरा सामना रंगणार आहे. धुळ्यात गोटेंचा जनसंपर्क दांडगा आहे आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्कही आहे. त्यामुळं त्याचा फटका भाजपला बसू शकतो.


महपालिका निवडणुकीत जय-पराजयाची अंतर हे अतिशय कमी असतं. भाजपमधल्या अनेक असंतुष्टांना गोटेंनी हाताशी धरलंय. त्यामुळं जिंकण्याची ताकद नसली तरी पराभव करण्याएवढं उपद्रमुल्य त्यांच्यात नक्कीच आहे. त्यामुळं भाजपची चिंता वाढली आहे.


मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे या निवडणुकीत खास लक्ष घालत आहेत. त्यामुळं भाजपचं पारडं जड आहे.


धुळे महापालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. 19 प्रभागांमध्ये 74 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार असून 10 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.


 

VIDEO: जीवाची बाजी लावत विहिरीतून सुखरूप बाहेर काढला विषारी कोब्रा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2018 05:27 PM IST

ताज्या बातम्या