धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता,काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजपने घवघवीत यश मिळवले आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 04:42 PM IST

धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता,काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा

मुंबई, 10 डिसेंबर : धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. भाजपच्या या विजयामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे बंड पुकारून भाजपविरोधात थंड थोपटणारे अनिल गोटे यांचं पुरतं पानिपत झालं आहे.

धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत बहुमताचा जादुई आकडा पार केला. भाजपने एकहाती सत्ता राखल्यामुळे भाजपने एकच जल्लोष सुरू केला. विशेष म्हणजे, भाजपमध्ये गुंडांना उमेदवारी दिली असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी बंड पुकारलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम नावाचा पक्ष स्थापन केला. अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्यानं धुळे महापालिकेची निवडणूक राज्यभर गाजली. गोटे यांनी आपल्या घरात पत्नी हेमा आणि मुलगा तेजस गोटेला उमेदवारी देऊन मैदानात उतरवलं. पण धुळेकर जनतेनं भाजपच्या पारड्यात मतं टाकत अनिल गोटे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीला साफ नाकारलं.

अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलं. मतदारांच्या कौलमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवरुन खाली उतरावं लागलं. काँग्रेसला 5 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 9 जागा आल्यात. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने 34 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु, या वेळी राष्ट्रवादीला एकेरी आकडाही गाठता आला. काँग्रेसच्याही 2 जागा कमी झाल्या आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही इथं फार मोठा करिश्मा दाखवता आला नाही. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा आल्या होत्या. यावेळी शिवसेनेला फक्त 2 जागा मिळाल्यात. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या एमआयएम पक्षाने 2 जागेवर विजय मिळवत खान्देशात पाऊल टाकलं आहे. बसपा, समाजवादी पक्षाने आपला गड कायम राखत अनुक्रमे 1 आणि 2 जागा जिंकल्यात. इथं मात्र, समाजवादी पक्षाला एका जागेचा फटका बसला.


विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव महापालिका निवडणुकीत विजयानंतर धुळ्याची जबाबदारी संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर सोपवली. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी चोख पार पाडत धुळे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावला आहे.

Loading...

===================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 10:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...