युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी थेट गाठलं 'मातोश्री', निर्णय मात्र गुलदस्त्यात!

युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी थेट गाठलं 'मातोश्री', निर्णय मात्र गुलदस्त्यात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट युतीच्या घडामोडींमधली सर्वात महत्त्वाची चर्चा समजली जाते.

  • Share this:

मुंबई 14 फेब्रुवारी : महाराष्ट्रात युती होणार की नाही याची चर्चा गेली कित्येक महिने सुरू आहे. दोनही पक्षांमधल्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजीही सुरू केलीय. मात्र युतीवर ठोस निर्णय होत नव्हता. असं सगळं गोंधळाचं वातावरण असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट मातोश्रीवर जाऊन पोहोचले. युतीच्या चर्चेतली ही सर्वात मोठी घडामोड समजली जाते. शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा झाल असून  चर्चा यापुढेही सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय.


गुरुवारचा दिवस हा युतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. दिवसभर विदर्भातले कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री सायंकाळी मुंबईत पोहोचले. विदर्भात त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना काही काळ आराम करावा लागला होता. मुंबई आल्यानंतर पुन्ह मुख्यमंत्र्यांनी बैठकिंना सुरुवात केली.


शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आधी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. त्यांच्यात आणि मुख्यमंत्र्यांमधे चर्चा झाली. त्यानंतर त्यात चंद्रकांत पाटील त्या चर्चेत सामील झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील मातोश्रीसाठी निघाले. मातोश्रीवर सर्व नेत्यांनी चर्चा केली. युतीच्या घडामोडींमधली ही सर्वात महत्त्वाची चर्चा समजली जाते.


आघाडीचं जमलं


युती होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी करत मित्र पक्षही मिळवले आहेत. तर अनेक जागेचे उमेदवारही निश्चित झाले आहेत. राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी पक्षाने आधीच या आघाडीसोबत हातमिळवणी केलीय. तर वंचित बहुजन आघाडीशीही बोलणी सुरू आहे. हे नवे पक्ष जोडत असतनाच आता मनसेचा पाठिंबा मिळविण्याचा  राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.


काही महिन्यांपूर्वी पुण्यात राज ठाकरेने घेतलेल्या शरद पवारांच्या बहुचर्चित मुलाखतीनंतर मनसे आणि राष्ट्रवादी जवळ यायला सुरुवात झाली. भाजपचं आव्हान समोर असल्याने मनसेसाठी ही लढाई अटीतटीची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी जवळीक साधली तर काही फायदा होण्याची शक्यता मनसेला वाटते आहे.


भाजपची स्थितीही चिंतेची


तर भाजपसोबत महादेव जानकर, विनायक मेटे, रामदास आठवले, सदाभाऊ खोत यांचे पक्ष असल्याने भाजपला मित्र पक्ष मिळाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, भाजपकडे असलेले काही मित्रपक्ष, मनसेची राष्ट्रवादीशी होत असलेली जवळीक या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत सध्यातरी कुठलाही मित्रपक्ष नाही.


तर शिवसेना एकटी पडणार


स्वबळावर निवडणुक लढण्याची शिवसेना कितीही गर्जना करत असली तरी एकट्याच्या जीवावर किती जागा जिंकेल हा खरा प्रश्न आहे. शिवसेनेच्या खासदारांनीही युती करा नाहीतर सध्या आहे तेवढ्या जागाही निवडून येणार नाहीत अशी भीती अंतर्गत बैठकांमध्ये व्यक्त केली होती.


तर युती झाली नाही तर त्याचा फटका भाजप आणि शिवसेनेलाही बसेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणेच म्हटलं होतं. त्यामुळे जागांसाठी शिवसेना कितीही दबाव आणत असली तरी भाजप एवढीच गरज शिवसेनलाही आहे.


आमचं शिवसेनेवर खुलं तर शिवसेनेचे आमच्यावर छुपं प्रेम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले होते. तर सोबत न येणाऱ्यांना पटक देंगे असा इशारा अमित शहांनी दिला होता. तर मोठा भाऊ शिवसेनाच आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपात युतीचं फिस्कटलं तर शिवसेनेला स्वबळावर लढावं लागणार आहे.

VIDEO : दहशतवाद्यांनी असा घडवून आणला Pulwama Terror Attack

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 09:45 PM IST

ताज्या बातम्या