S M L

रायगडावर चेंगराचेंगरी, दगड अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2018 07:38 PM IST

रायगडावर चेंगराचेंगरी, दगड अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

महाड, 06 जून : रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानंतर गड उतरत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत आणि त्यातच डोंगरावरून आलेल्या दगडाने एक शिवप्रेमी ठार तर सात जण जखमी झाले आहेत. गड उतरत असतांना महादरवाजाजवळ अरुंद वाटेमुळे गर्दी आटोक्यात न आल्याने ही घटना घडली.

रायगडाव आज शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रचंड गर्दी उसळली होती. लाखोंच्या संख्येने  शिवप्रेमीं गडावर आलेले होते. या सर्वानाच रोपवेची सुविधा न मिळाल्याने अनेकांनी गड पायी चढउतार केला. दुपारी हा सोहळा आटपून शिवप्रेमी गड उतरत होते. गर्दी इतकी होती की पाउलवाटा आणि पायऱ्यांवरुन उतरणही अवघड झाले.चित्त दरवाजा ते हत्ती तलाव पर्यंत शिवप्रेमीची रांग दिसत होती. शिवराज्याभिषेकदिन सोहळा सुरू असताना पायी येणाऱ्यांची गर्दी आणि गड उतरणाऱ्याची गर्दी यामुळे अरुंद पायवाट आणि पायऱ्या यामुळे खुबलढा बुरुज, महादरवाजा, याठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा घटना घडल्या. याच दरम्यान महादरवाजा ते खुबलढा बुरुज परिसरात डोंगरावरून आलेल्या दगडाने एकाचा प्राण घेतला. अशोक उंबरे (वय 19,रा.उळूप, ता. भूम, जिल्हा उस्मानाबाद )असं या मयत शिवप्रेमीचे नाव आहे.

त्याच्या सोबत चालत असलेल्यांपैकी मंदा मोरे ( वय 45 रा. सोलापूर, सोनाली गुरव (वय 30 रा.सातारा), अमोल मोरे (वय 23 रा.हडपसर), रामदेव महादेव चाळके (वय 39), अभिजित फडतरे (वय 23 सातारा), निलेश फुटवळ ( वय 35) अमित महांगरे (वय 24 रा.खेड शिवापूर) हे जखमी झाले आहेत. या जखमींना पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

रायगडावर झालेल्या गर्दीने दुपारी रायगडावर शिवप्रेमीना थांबवण्यात आले. गडाचा महादरवाजा बंद करण्यात आला. यामुळे दोन्ही बाजूला मोठी गर्दी उसळली. प्रत्येक जण गड उतरण्याच्या दिशेने असल्याने अनेकांनी रायगडाच्या तटबंदीवर चढून उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे भयभीत झालेले शिवप्रेमी सुरक्षितस्थळी जाण्याच्या प्रयत्न करू लागल्याने चेंगराचेंगरी होत होती. गर्दीपुढे पोलीस प्रशासन देखील हतबल झाले. गेली दोन दिवस जमलेल्या गर्दीचा अंदाज पोलीस प्रशासनाला न आल्याने ही घटना घडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 07:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close