सीबीआयला मोठा धक्का, शरद कळसकरचा ताबा मागणारा अर्ज कोर्टाने फेटाळला

सीबीआयला मोठा धक्का, शरद कळसकरचा ताबा मागणारा अर्ज कोर्टाने फेटाळला

शरद कळसकरचा ताबा मागणारा सीबीआयचा अर्ज सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 29 ऑगस्ट : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा सीबीआयला ताबा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. या सीबीआयला धक्का मानला जातोय. सीबीआयचा अर्ज कायदेशीरदृष्ट्या योग्य नाहीये असं म्हणत कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. इतकंच नाही सीबीआयच्या कार्यपद्धतीवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकरची या प्रकरणातील आणखी एक आरोपी सचिन अंदुरे यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्यानं त्याचा ताबा देण्याची मागणी सीबीआयनं केली होती. सचिन अंदुरेची पोलीस कोठडी उद्या म्हणजे ३० आॅगस्टला संपत असून त्याला उद्या न्यायालयीन कोठडी मिळाल्यास कळसकर आणि अंदुरे यांची समोरासमोर चौकशी करता येणार नाही असा युक्तीवाद सीबीआयनं केला. तसंच दाभोलकर यांचं हत्या प्रकरण संवेदनशील असल्यानं कळसकरचा ताबा मिळणे अत्यावश्यक असल्याचा युक्तीवाद सीबीआयच्या वतीनं करण्यात आला.

पण मुळात एखादा आरोपी एखाद्या यंत्रणेच्या पोलीस कोठडीत असताना त्याला दुस-या यंत्रणेच्या पोलीस कोठडीत देण्यात यावा अशा तुमच्या युक्तीवादाला काही कायदेशीर आधार आहे का असा सवाल कोर्टाने सीबीआयला केला पण त्याचं कोणतंही उत्तर सीबीआयकडून नव्हतं. केवळ दाभोलकर प्रकरण महत्त्वाचं असून त्याकरता कळसकरचा ताबा आवश्यक असल्याची भूमिका सीबीआयनं मांडत किमान २ दिवस ताब्याची मागणी केली. सीबीआयच्या एकंदरीतच कार्यपद्धतीवर कोर्टाने नाराजी व्यक्त करत काल जेव्हा कळसकरच्या पोलीस कोठडीची मागणी एटीएसनं केली त्यापूर्वीच तुम्ही कळसकरच्या पोलीस मागायला हवी असं कोर्टाने सीबीआयला सुनावलं.

तसंच ज्यावेळी पुणे कोर्टाने २३ आॅगस्टला कळसकर विरोधात प्राॅडक्शन वाॅरंट जारी केलं होतं त्याचवेळी सीबीआयनं कोर्टात धाव घ्यायला हवी होती, सीबीआयनं ५ दिवस घालवले आणि त्यानंतर एटीएसला कळसकरची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर मग आपल्याला त्याची पोलीस कोठडी हवी अशी मागणी करणं अनाकलनीय आहे असं कोर्टाने म्हटलं. तसंच कायद्याचा कोणताही आधार नसताना कळसकरचा ताबा आपण सीबीआयला द्यायला तयार आहोत असं एटीएस म्हणू कसं शकतं असा सवालही कोर्टाने विचारला.

एखादा आरोपी जेव्हा न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हाच त्याची पोलीस कोठडी मागता येते या कायदेशीर बाबीची सीबीआयला आठवण करुन देत ३ सप्टेंबरला जेव्हा पुन्हा कळसकरची पोलीस कोठडी संपेल तेव्हा त्याचा सीबीआय कोठडीची मागणी करा असं म्हणत कोर्टाने सीबीआयचा अर्ज फेटाळलाय.

 

आपल्या एसबीआय अकाऊंटच्या या ६ गोष्टी कोणालाही सांगू नका...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 12:54 PM IST

ताज्या बातम्या