'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल

'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल

पतीने भारतात येऊन नागपुरच्या कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

  • Share this:


प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 16 जानेवारी : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जलद गती यावी, अशी सर्वसामान्याची अपेक्षा आहे. नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पती पत्नीमधील खटला निकाली काढला आहे. अमेरिकेत राहणारी पत्नी आणि भारतात राहणाऱ्या पतीमधील हा खटला वकिलाच्या फोनवरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलने कोर्टाने निकाली काढून नवा पायंडा पाडला आहे.

2013 मध्ये नागपुरात लग्न झालेलं हे जोडपं अमेरिकेतील मिशिगनमध्ये स्थायिक झालं होतं. परंतु, लग्नाच्या चारवर्षानंतर पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले आणि खटके उडू लागल्याने दोघेही अमेरिकेमध्ये वेगवेगळे राहाय़ला लागले होते.

दरम्यानच्या काळात पतीने भारतात येऊन नागपुरच्या कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अमेरिकेत राहत असलेली पत्नी घटस्फोटासाठी तयार असल्यानं सर्व कागदपत्रं अमेरिकेत पाठवण्यात आली.

आता अडचण होती कोर्टात महिलेच्या जबाबाची. मग न्यायालयाने महिलेच्या वकिलाच्या फोनवरून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला आणि ही प्रक्रिया पूर्ण केली. कोर्टानेही खटला निकाली काढत घटस्फोट मंजूर केला.

'आम्ही या प्रकरणात सर्व दस्ताऐवज मिशीगन अमेरिकेत माझ्या अशिल महिलेकडे पाठविले होते. तिने ते नोटराईज करून परत केले. पण कोर्टात तिला हजर राहणे शक्य नव्हते. कारण, ती स्टुडंट व्हिजावर अमेरिकेत गेली आहे. म्हणून आम्ही या प्रकरणात व्हॉट्सअॅप कॉल केला आणि हे शक्य झाले', अशी माहिती महिलेच्या वकील अँड स्मिता सरोदे-सिंगलकर यांनी दिली.

खरंतर कौटुंबिक कोर्टाच्या प्रकरणांमध्ये नवरा बायकोमध्ये एकदा बेबनाव झाला तर दोन्ही पक्षांच्या वतीने कुठलेही सामजस्य दाखवले जात नाही. या प्रकरणामध्ये महिलेनं सर्व कागदपत्रे अमेरिकेहून नागपुरात पाठवल्यानंतर तिची या घटस्फोटासाठी संमती आहे की, नाही हे कोर्टाला स्वत: तपासायचे असल्याने तिला कोर्टात हजर राहणे आवश्यक होते.

अमेरिकेतल्या प्रवाशी कायद्यानुसार, महिला जर भारतात आली तर तिला परत अमेरिकेचा व्हिसा मिळणे कठीण झाले असते. त्यामुळे तिची सहमती व्हिडिओ कॉलद्वारे घेण्यास पतीच्या वतीने कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही हे विशेष.

'या प्रकरणामध्ये पती आणि पत्नी दोघांचेही एकत्र राहणे अशक्य होते. त्यामुळे आम्ही या प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले. दोघांनीही दागिणे आणि इतर वस्तु कशा काय वेगवेगळ्या करायच्या याचा निर्णय़ घेतल्यानं प्रकरण संपले आणि घटस्फोट झाला. आता दोघेही आपले नव आयुष्य नव्याने सुरू करू शकतील',असं वकील समीर सोनावणे यांनी सांगितलं.

कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने या प्रकरणात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं फक्त दोन्ही पक्षांचा वेळच वाचला नाही, तर दोन व्यक्तींना आपले नवे जीवन पुन्हा सुरू करता आले आहे. देशात कायद्याच्या क्षेत्रात जर नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर अनेक खटले लवकरात लवकर निकाली निघू शकतील.

देशभरातील न्यायालयांमध्ये छोट्या मोठ्या अडचणींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी केसेस प्रलंबित आहेत. नागपुरच्या कौटुंबिक कोर्टाने फक्त व्हिडिओ कॉल सारखे साधे तंत्रज्ञान वापरुन हा खटला वेळीच निकाली काढून नवा प्रघात घातला आहे.


===================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या