काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळं लढावं का? हे आहे अजित पवारांचं मत

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळं लढावं का? हे आहे अजित पवारांचं मत

'बैठकीनंतर असेच लोक बोलतात की जे कुठे नगरपालिके मध्येही निवडून येणार नाहीत. स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नाही.'

  • Share this:

मुंबई 7 जून : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे वेगवेगळे सूर या दोनही पक्षात ऐकू येत आहेत. काँग्रेसच्या बैठकीत काही नेत्यांनी वेगळं लढलं पाहिजे असा सूर लावला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. जे असं मत व्यक्त करतात त्यांच्या मताला काहीही किंमत नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, आम्ही काँग्रेसला मदत केली हे त्यांच्या निवडून आलेल्या खासदारांना विचारा. एकत्रच राहील पाहिजे त्यातच दोघांचंही भलं आहे. काँग्रेसने काय चर्चा करावी हा काँग्रेसचा विषय आहे. पण बैठकीनंतर असेच लोक बोलतात की जे कुठे नगरपालिके मध्येही निवडून येणार नाहीत. स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नाही.

काँग्रेसच्या बैठकीत काय झालं?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ता दोन्ही पक्षांनी चिंतन बैठका घेत पराभवाची कारणं शोधायला सुरूवात केली आहे. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीकरता देखील तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेसनं घेतलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सूर निघाला. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असा सूर देखील या बैठकीमध्ये निघाला. तर, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यापेक्षा वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशी मागणी यावेळी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केली. सुत्रांनी याबबतची माहिती दिली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस 1 तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागांवर विजय मिळाला. शिवसेना – भाजपनं विधानसभेसाठी देखील युतीची घोषणा केली आहे. पण, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत मात्र अद्याप तरी कोणतीही ठोस अशी घोषणा झालेली नाही.

वंचितचा आघाडीला फटका

लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फटका बसला. अनेक मतदारसंघात मतांची आकडेवारी पाहता प्रथमदर्शनी तरी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला वंचितचा फटका बसल्याचं दिसून येतं. त्यामुळे विधानसभेसाठी काय राजकीय गणितं असणार याबद्दल आता राजकीय तर्क – वितर्क लढवले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 10:15 PM IST

ताज्या बातम्या