कोकणात गणपतींची सजावट यंदा तरी चिनी वस्तूंनीच होणार

कोकणात गणपतींची सजावट यंदा तरी चिनी वस्तूंनीच होणार

त्यामुळे गणेशोत्सवासाठी सज्ज झालेल्या कोकणातल्या बाजारपेठांमध्येही चिनी वस्तूंचाच भरणा दिसून येतोय. तर बाजारात दाखल झालेल्या भारतीय उत्पादनं ही चिनी वस्तूंच्या तुलनेत महाग आहेत.

  • Share this:

दिनेश केळुस्कर,प्रतिनिधी

कोकण,16 ऑगस्ट: भारतीय बाजारपेठेतील चिनी वस्तूंवर वेगवेगळ्या संघटनांकडून ठिकठिकाणी बहिष्कार घालण्यात येत असला तरी स्वस्तात मिळणाऱ्या चिनी वस्तूंना भारतीय उत्पादनांचा सक्षम पर्याय पुरेसा उपलब्ध नाही . त्यामुळे गणेशोत्सवासाठी सज्ज झालेल्या कोकणातल्या बाजारपेठांमध्येही चिनी वस्तूंचाच भरणा दिसून येतोय. तर बाजारात दाखल झालेल्या भारतीय उत्पादनं ही चिनी वस्तूंच्या तुलनेत महाग आहेत.

कोकणातील बाजारपेठा आता गणेशोत्सवासाठी सज्ज झाल्या आहेत. पण सजावटीसाठी विकल्या जाणाऱ्या एल.ई.डी दिव्यांच्या माळा असो किंवा शोभेच्या इलेक्ट्रीक वस्तू असो. या सगळ्या वस्तू चायना मेडच आहेत. कारण त्या स्वस्तही आहेत आणि या वस्तूंना पर्याय म्हणून पुरेश्या प्रमाणात भारतीय उत्पादनं बाजारपेठेत उपलब्ध नाहीत.

रत्नागिरीच्या बाजारात चायना मेड एलईडी दिव्यांच्या माळा आणि चायनिज टॉर्च विकणारे रझाकभाई सांगतात की, 'या चायना मेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या माळा कमीत कमी साठ रुपयांपासून पाचशे साडेपाचशेपर्यंत आहेत. आम्ही चिनी वस्तू विकतो याचं कारण पर्यायी भारतीय माल अजून आलेला नाही. ते झालं तर दुसऱ्याच्या वस्तूला कशाला प्रोत्साहन देऊ? आपण आपलंच विकू. आता पतंजलीला प्रॉफिट झाला की नाही? तसं प्रोत्साहन इतर लोकांना पण मिळालं पाहिजे तरच भारत पुढे येणार ."

दुसरीकडे चिनी वस्तूंना पर्याय म्हणून सजावटीसाठी शोभेच्या फुलांच्या माळा आणि कमानी यासारख्या भारतीय वस्तू बाजारात उपलब्ध आहेत . त्या चिनी वस्तूंपेक्षा चांगल्या क्वालिटीच्या असल्या तरी किमतीत तुलनेने जवळपास दुप्पट असल्याचं फुलांच्या माळा विकणारा दिनेश खावरा सांगतो.

सजावटीसाठी थर्मोकोलची उत्पादन विकणाऱ्या काही काही दुकानदारानी मात्र स्वत:हूनच चिनी वस्तू विक्रीला ठेवायच बंद केलंय. त्याचं एक कारण आहे जीएसटी. रत्नागिरीचे गिरिश तावडे हे दुकानदार सांगतात की " चीनच्या वस्तू जवळ जवळ शंभर टक्के आम्ही बंद केल्या आहेत. जीएसटीची बिलं मिळत नसल्यामुळे व्यापारी चीनच्या वस्तू मागवत नाहीत "

चिनी वस्तू वापरू नका म्हणून शेकापने पनवेलमध्ये चिनी वस्तू तिरडीवर ठेवून त्यांची होळी केली. आणि मेट्रो सुध्दा चिनी असू नये असा इशारा दिला होता. तिकडे नागपूरमध्ये भारत तिबेट सहयोग मंचाने कॉटन मार्केटजवळ चिनी वस्तूंची होळी केली . वर्धेमध्ये युवा परिवर्तन की आवाज या संस्थेने चिनी वस्तूंची होळी केली.

या सगळ्या बातम्या आपण ज्या मोबाईलवर वाचतो हे सगळे स्मार्टफोन पण चिनी कंपन्यांचे आहेत ज्याचा भारताच्या स्मार्टफोनच्या बाजरपेठेतला हिस्सा चाळीस टक्क्यांहून जास्त आहे . त्यामुळे चिनी वस्तूंना पर्याय काय हा खरा प्रश्न आहे .

भारतातल्या छोट्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप सारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. यातून सक्रीय होणाऱ्या उद्योजकांना पोषक वातावरण मिळालं तर काही प्रमाणात भारतीय बाजारपेठेत स्वदेशी उत्पादनांचा ओघ वाढू शकतो. गुणवत्तेच्या तुलनेत चिनी वस्तूंपेक्षा भारतीय उत्पादनं अधिक चांगली आहेत हे खरं आहे पण शेवटी ग्राहक

'स्वस्त आणि मस्त' कडेच खेचला जाणार हे वास्तव टाळता येत नाही .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 06:11 PM IST

ताज्या बातम्या